
सौदी अरेबियातील मदानीजवळ सोमवारी झालेल्या बस अपघातात 45 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. या अपघातात उमराह यात्रेवरून परतत असताना हैदराबादमधील एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचा अंत झाला. मृतांमध्ये 9 मुलांचा समावेश आहे. अपघातात नसीरुद्दीन, त्यांची पत्नी, तीन मुली, मुलगा, सून आणि नातवंडे यांचा मृत्यू झाला. या अपघातात केवळ एक प्रवासी बचावला आहे.
हैदराबादमधील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी नसीरुद्दीन (65) हे आपल्या कुटुंबासह उमराह यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते. उमरा यात्रा झाल्यानंतर सर्वजण बसने मदिनाला परतत होते. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. भाविकांची बस तेलाच्या टँकरला धडकली आणि अपघातग्रस्त झाली. या अपघातात नसीरुद्दीन यांच्या कुटुंबातील 18 सदस्यांसह बसमधील 45 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नसीरुद्दीन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

























































