
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले होते. हा तर फक्त एक 88 तासांचा ट्रेलर होता. पाकिस्तानने पुन्हा संधी दिली तर जबाबदार देश शेजाऱ्यांशी कसा वागतो हे पाकिस्तानला सांगण्यापासून आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला. दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी दिलेल्या इशाऱयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवी दिल्ली येथे चाणक्य संरक्षण संवादात एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की शत्रूला जेव्हा वाटेल की, त्याने चूक केली तर हिंदुस्थान लगेच कारवाई करेल. हीच खरी ताकत आहे. आज हिंदुस्थानाची लष्करी क्षमता तशी झालेली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा तर फक्त 88 तासांचा ट्रेलर होता. चित्रपट सुरूच झाला नव्हता. पुढे कशी परिस्थिति निर्माण होऊ शकते याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. पाकिस्तानने पुन्हा संधी दिल्यास पाकिस्तानला जबाबदार देश कसा वागतो हे शिकवून देऊ, असे जनरल द्विवेदी म्हणाले.



























































