
सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजप नेतृत्वाने मिंध्यांचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना एकाकी पाडत शेकापसह सर्व पक्षीय आघाडी करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या या राजकीय खेळीने शहाजीबापू चांगलेच संतप्त झालेत. भाजपने केलेली ही खेळी हिडीस, किळसवानी, दहशतवादी आणि एखाद्या अबलेवर केलेली बलात्कारी कृती असल्याचे सांगत पाटलांनी भाजपावर आसूड ओढत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
शिवसेनेशी गद्दारी करुन शहाजीबापू मिंध्याबरोबर गुवाहाटीला गेले होते. तेव्हा गुवाहाटीचा निसर्ग पाहून पाटलांनी “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील समंद ओके मंदी”…हा मारलेला डायलॉग प्रसिद्ध झाला होता. भाजपच्या अदृश्य शक्तीमुळे शहाजीबापू यांचे आजवर सगळं ओकेमध्ये चालले होते. पण आज काहीही ओके दिसत नाही. कालपर्यंत भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंड भरुन कौतुक करणारे पाटील आज भाजप आणि नेतृत्वाच्या नावाने बोटे मोडताना दिसत आहेत.
काही दिवसापूर्वी भाजपचे नेते, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील शहाजीबापू पाटलांना विधानसभेच्या निवडणुकीत कसा धोबीपछाड दिला याची जाहीर कबुली दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर बापूंना नगरपरिषद निवडणुकीत दुसरा झटका बसला आहे.
सांगोला विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्र पक्ष असलेल्या मिंध्याना साथ न देता शेकापला जवळ करुन शहाजीबापूंना एकाकी पाडले आहे. भाजपच्या या अनपेक्षित खेळीने पाटील चांगलेच घायाळ झालेले दिसतात. भाजपने आपल्यावर राजकीय बलात्कार केल्याची त्यांची भावना झाली आहे. या राजकीय अत्याचारबद्दल बापूंनी मिंध्याकडे धाव घेतली असून भाजपने अशा नव्या युक्त्या लढविल्या तर महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचा ऱ्हास होईल अशी भीती पाटलांनी प्रसार माध्यमासमोर व्यक्त केली आहे.




























































