जगात कुशल कामगारांचा मोठा तुटवडा; उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मांडले वास्तव

जगात एआयमुळे व्हाईट कॉलरच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असे मानले जात असताना उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी यापेक्षा मोठय़ा वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. आनंद महिंद्रा यांनी आर्थिकदृष्टय़ा प्रभावी असलेल्या सर्वच क्षेत्रांमध्ये कुशल कामगारांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. खरा धोका मशीनमुळे नाही, तर माणसांच्या कमतरेमुळे असल्याचे त्यांनी म्हटलेय.

आनंद महिंद्रा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलेय की, ‘एआय व्हाईट कॉलर नोकऱ्या नष्ट करेल या भीतीबाबत चर्चा करण्यात आपण इतके व्यस्त आहोत की, यामुळे आपण एका मोठय़ा संकटाकडे दुर्लक्ष करत आहोत. ते संकट म्हणजे कुशल कामगारांचा तुटवडा.’ महिंद्रा म्हणाले की, अनेक दशकांपासून समाजाने पदवी, डेस्क नोकऱ्यांना वरचे स्थान दिले आहे, तर जिथे काwशल्य लागते अशा नोकऱ्यांना तळाशी ढकलले आहे. यामुळे एक अशी पिढी निर्माण झाली आहे जी कौशल्ये लागणाऱ्या व्यवसायांपासून दूर गेली, पण मजेशीर गोष्ट अशी आहे की, या अशा नोकऱ्या आहेत ज्यांची जागा एआय घेऊ शकत नाही. आजची क्रांती नोकरीच्या कमतरतेतून नाही, तर कुशल मजुरांच्या कमतरतेतून निर्माण होत आहे, असे महिंद्रा म्हणाले.