
एमएमआरडीएच्या वरळी – शिवडी उन्नत मार्गातील प्रकल्प बाधितांना लवकरच वडाळा येथील शिवप्रेरणा सहकारी गृहनिर्माण संस्था येथे पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पबाधितांचे त्याच परिसरात पुनर्वसन व्हावे, यासाठी शिवसेनेने वारंवार एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे रहिवाशांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
वरळी – शिवडी उन्नत मार्गामुळे सेना नगर, हनुमान नगर व एकात्मता फुले नगरमधील 75 रहिवाशी विस्थापित होणार आहे. या रहिवाशांना त्याच परिसरात पर्यायी घर मिळावे यासाठी स्थानिक शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. यासंदर्भात त्यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांची भेट घेतली. या बैठकीत विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी मुखर्जी यांनी एसआरएचे सीईओ यांच्याकडे घरांची मागणी केली. यावेळी एमएमआरडीएचे अधिकारी किरण महाजन, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, एसआरएचे दत्तात्रय पाटील, उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर आदी उपस्थित होते.
रहिवाशांना मिळणार 20 हजार रुपये भाडे
शिव प्रेरणा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था या इमारतीचे बांधकाम सुरू असून त्यास पूर्ण होण्याकरीता काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुढील 1 वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 75 घरे रहिवाशांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच ही घरे मिळेपर्यंत रहिवाशांना दरमहा 20 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच रहिवाशांसोबत करारनामा केला जाणार आहे.





























































