
विक्रोळी पार्कसाईट येथील पालिकेचे भाडेकरू राहत असलेल्या धोकादायक इमारतींवर प्रशासनाने आज धडक कारवाई केली. मात्र यावेळी रहिवाशांनी आम्हाला 650 चौरस फुटांची घरे द्या, आधी ऍग्रीमेंट द्या अशी मागणी करीत घरे रिकामी करण्यास विरोध केला. मात्र पालिकेने पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करीत रहिवाशांना बाहेर काढले. पहारीने घरांचे दरवाजे उखडून टाकून कारवाई करण्यात आली.
पार्कसाईट येथे पालिकेचे भाडेकरू गेल्या 50 वर्षांपासून राहत आहेत. या ठिकाणच्या 24 इमारतींमध्ये सुमारे 435 कुटुंबे राहत आहेत. ही घरे ‘सी-1’ म्हणजे अतिधोकादायक कॅटेगरीत गेल्याने याआधीच रिकामी केली असून काही घरे रिकामी करायची आहेत.
नोकरीचे ठिकाण लांबले, शाळेत कसे जाणार!
या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनी आपल्याला इमारतीपासून तीन किमीच्या परिसरात पर्यायी घरे द्या अशी मागणी केली. अचानक भांडुपच्या ‘पीएपी’मध्ये पाठवल्यामुळे नोकरीचे ठिकाण आणि प्रवास लांबला आहे. शिवाय शालेय वर्षांच्या मध्यावर घर सोडावे लागल्याने मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागणार असल्यामुळे गैरसोय होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
विक्रोळी येथील पालिकेचे भाडेकरू राहत असलेल्या इमारती धोकादायक असल्याने त्या रिकामी करण्यात येत आहेत. शिवाय सद्यस्थितीत रहिवाशांसाठी भांडुपमध्ये सर्वसुविधायुक्त घरे देण्यात आली आहेत. शिवाय पालिकेच्या माध्यमातून विक्रोळीतच पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. – गजानन बेल्लाळे, सहायक आयुक्त, ‘एन’ विभाग






























































