लेख – उसाचा हिरवा पट्टा आणि बिबट्यांचा वाढता वावर

>> गोरख तावरे

बिबट्या हा आपल्या जैवविविधतेचा अभिन्न घटक आहे. तो शत्रू नाही, तर परिसंस्थेचा संतुलन राखणारा घटक आहे. मात्र त्याची अनियंत्रित वाढ मानववस्तीच्या सुरक्षिततेसाठी संकट निर्माण करू शकते. आता तरी शासन, वनविभाग आणि स्थानिक जनता यांनी संयुक्तपणे या प्रश्नावर कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा उसाच्या हिरव्या पट्टय़ातून भविष्यात संघर्षाच्या लाल सावल्या उमटतील आणि त्या वेळी उशीर झालेला असेल.

सातारा जिह्यातील कराड व पाटण तालुक्यांत गेल्या दोन दशकांपासून बिबटय़ांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. कृष्णा, सह्याद्री, अजिंक्यतारा, मरळी, शेडगेवाडी, पाली या परिसरांतील साखर कारखान्यांमुळे झालेल्या ऊस लागवडीने या भागात बिबटय़ांसाठी अनुकूल अधिवास निर्माण केला आहे.

ऊस हे या प्राण्याचे निवासस्थान, शिकारीचे क्षेत्र आणि प्रजननस्थळ ठरले आहे. आज जवळपास तीन ते चार पिढय़ा उसाच्या रानात जन्मलेल्या बिबटय़ांच्या वर्तनात जनुकीय बदल दिसत आहेत. त्यांच्या मेंदूत ‘उसाचे रान म्हणजेच घर’ ही प्रवृत्ती खोलवर रुजली आहे.

वनविभागाने काही बिबटय़ांना पकडून जंगलात सोडले असले तरी ते पुन्हा उसाच्या रानात परतले आहेत. कारण त्यांना जंगल परिचित नाही. त्यांच्या दृष्टीने ऊसच सुरक्षित आसरा आहे. बिबटय़ा हा अत्यंत परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी आहे. त्यामुळे तो जंगलाबाहेरही टिकाव धरतो.

आज या परिसरात बिबटय़ांची उपस्थिती गावांच्या जवळपास, शेतात आणि कधी कधी वस्तीतही दिसू लागली आहे. हा बदल निसर्गातील असमतोलाचा आणि मानवाच्या शेती पद्धतीतील परिवर्तनाचा परिणाम आहे.

बिबटय़ा हा चपळ व चोरटा शिकारी आहे. जंगलात तो हरीण, माकड, साळिंदर, ससा अशा शिकारींवर गुजराण करतो, परंतु वस्तीच्या जवळ आल्यावर तो शेळ्या, कुत्री, मेंढय़ा, डुक्कर यांसारख्या पाळीव प्राण्यांची शिकार करतो. अगदी उंदीर, घुशी, बेडूक, खेकडा अशी लहान शिकारही त्याच्या आहारात असतात. त्यामुळे उसाच्या शेतीत त्याला विपुल अन्न उपलब्ध होते आणि तेथील पाणी व आसरा यामुळे त्याचा टिकाव सहज लागतो.

वनविभाग दरवर्षी व्याघ्र प्रकल्पांतर्गत वन्यजीव गणना करतो. कॅमेरा ट्रपद्वारेही नोंदी घेतल्या जातात. मात्र अभयारण्याबाहेरील प्रादेशिक विभागांकडे अशी नियमित गणना आणि नियोजन नाही. त्यामुळे जंगलाबाहेरील बिबटय़ांची अचूक संख्या मोजली जात नाही.

सातारा जिह्यात सध्या जवळपास 39 गावे अशी आहेत, जिथे बिबटय़ांचा वावर वारंवार दिसून येतो. ही संख्या आणि घडामोडी गंभीर इशारा देणाऱया आहेत. 2001-02 मध्ये पुणे जिह्यातील जुन्नर येथे बिबटय़ा-मानव संघर्षामुळे 11 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 25 हून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर वनविभागाने 103 बिबटय़ांना पकडून रेकॉर्ड मोडला होता. काहींना माणिकडोह निवारण केंद्रात, तर काहींना चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले.

परंतु अभ्यासातून असे स्पष्ट झाले की, त्या बिबटय़ांपैकी काही पुन्हा जुन्नरकडे परतले. कारण मांजर कुळातील प्राण्यांना त्यांच्या जन्मभूमीकडे परतण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे फक्त स्थलांतर हा उपाय नाही, तर दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे.

आज कराड व पाटण परिसरांतील परिस्थिती जुन्नरप्रमाणेच गंभीर बनत चालली आहे. या भागातील कृष्णा व कोयना नद्यांच्या परिसरात विपुल पाणी आणि उसामुळे सुरक्षित निवारा उपलब्ध आहे. त्यामुळे बिबटय़ांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे.

मादी बिबटय़ा वर्षभर प्रजननक्षम असते आणि साधारणतः तीन पिल्लांना जन्म देते. आता चार-पाच पिल्ले होण्याचेही प्रमाण वाढले आहे. ऊस तोडणीच्या काळात पिल्लांसाठी संघर्ष सुरू होतो, तेव्हा माणसांशी थेट सामना होण्याच्या घटना घडतात. अंदाजे 50 टक्के पिल्लेच प्रौढावस्थेपर्यंत पोहोचतात, परंतु ती पुढे स्वतंत्र क्षेत्र शोधत जातात.

कराड व पाटण परिसरांतील बिबटय़ांची वाढती संख्या लक्षात घेता वनविभागाने आता निश्चित धोरण आखणे अत्यावश्यक आहे. बिबटय़ा दिसल्याची सनसनाटी मथळ्यांसह बातमी देण्याऐवजी नागरिकांमध्ये भीतीपेक्षा जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांची आहे.

ज्या गावांमध्ये बिबटय़ांचा वावर आहे, तेथे रेस्क्यू युनिट्स, प्रबोधन मोहीम आणि स्थानिक स्वयंसेवकांची मदत आवश्यक आहे. बिबटय़ा हा आपल्या जैवविविधतेचा अभिन्न घटक आहे. तो शत्रू नाही, तर परिसंस्थेचा संतुलन राखणारा घटक आहे. मात्र त्याची अनियंत्रित वाढ मानववस्तीच्या सुरक्षिततेसाठी संकट निर्माण करू शकते.

आता तरी शासन, वनविभाग आणि स्थानिक जनता यांनी संयुक्तपणे या प्रश्नावर कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा उसाच्या हिरव्या पट्टय़ातून भविष्यात संघर्षाच्या लाल सावल्या उमटतील आणि त्या वेळी उशीर झालेला असेल.

  • बिबटय़ांची नसबंदी ः वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे अशा प्रकल्पाचा विचार व्हावा.
  • कॅरिंग कॅपॅसिटी अभ्यास ः प्रत्येक जिल्हा किती बिबटय़ांना झेपवू शकतो याचे परीक्षण होणे गरजेचे आहे.
  • प्रशिक्षित मनुष्यबळ ः सध्याच्या वनरक्षकांवर मोठा कामाचा ताण आहे. त्यामुळे स्वतंत्र वन्यजीव संशोधन व नियंत्रण युनिट्स तयार होणे आवश्यक आहे.
  • या संकटाला सामोरे जाण्यासाठी लोकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे.
  • नागरिकांना बिबटय़ासोबत सहअस्तित्वाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक जिह्यात ‘बिबटय़ा प्रबोधन युनिट’ स्थापन करणे गरजेचे आहे.
  • शिकार झालेल्या जनावरांच्या मालकांना 48 ते 72 तासांत नुकसानभरपाई देण्याची यंत्रणा बळकट करावी.
  • गाव स्वच्छ ठेवणे, भटक्या कुत्र्यांचे निर्बंध आणि बंदिस्त गोठय़ांचा वापर वाढवणे, हे उपाय बिबटय़ांना वस्तीपासून दूर ठेवू शकतात.