आभाळमाया – पृथ्वी-कवचाची ‘भरती-ओहोटी!’

>> वैश्विक

पावसाळी दिवसात आपल्यासारख्या सात हजार किलोमीटर समुद्रकिनारा असलेल्या देशाला आणि सातशे किलोमीटरचा सागरतट असलेल्या राज्याला वारंवार हाय-टाईड किंवा समुद्राच्या उधाणाच्या भरतीचा इशारा दिला जातो. भरती-ओहोटीची वेळ लक्षात घेऊन कोणत्या वेळी पाऊस पडला तर पाणी जास्त तुंबण्याची शक्यता आहे ते ठरवता येते. तशी एरवीही समुद्राला भरती येतच असते. मुख्यत्वे चंद्राच्या आणि सूर्याच्याही गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होऊन पृथ्वीवरच्या सुमारे 73 ते 75 टक्के सागरी पाण्याची जी ‘ओढाताण’ होते, त्यालाच आपण भरती-ओहोटी म्हणतो.

पृथ्वीला चंद्र नसता आणि भरती-ओहोटीचा वेग आज आपण अनुभवतो तसा नसता तर जीवसृष्टी निर्माण होण्याची प्रक्रिया कदाचित मंदावली असती. भरती-ओहोटीचे विविध परिणाम आपल्याला रोजच जाणवत असतात. विशेषतः किनारपट्टीच्या लोकांना ते अधिक अनुभवाला येते. समुद्राच्या पाण्याच्या वाढण्याच्या आणि ओसरण्याच्या रोजच्या प्रक्रियेमुळे या भागातील जमिनीचा खारेपणा, त्यावर वाढणारी तिवरांची किंवा कांदळवनांची ‘भिंत’ तसंच पृथ्वीवरचं वेगवेगळ्या ठिकाणचं तापमान लक्षात घेता वाऱयांच्या स्वरूपातही फरक पडतो.

भरतीच्या वेळेस किनाऱयालगतची जमीन जास्त खारवटते. तिथल्या दलदलीच्या आणि नदी सागराला मिळते त्या मुखापाशी वेगळीच जैवसाखळी विकसित होते. याशिवाय जमिनीची धूप आणि वालुकामय भागावर होणारा परिणाम वेगळाच.

समुद्राच्या पाण्याप्रमाणेच पृथ्वीवरच्या सर्वच पाणवठय़ांना भरती-ओहोटी येत असते. कारण चंद्र-सूर्य-पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव सर्वच द्रवांवर पडतो. अर्थात परातीत ठेवलेल्या पाण्याची भरती-ओहोटी काही मोजता येणार नाही की दिसणारही नाही, परंतु तीही असतेच. सागरी भरती-ओहोटीचे गणित दर्यावर्दी लोकांना ठाऊक असावे लागते. आपल्याला कोणतीही चांद्र तिथी ठाऊक असेल तर त्यावरून एक सोपं गणित करता येतं. समजा तिथी चतुर्थी असेल तर ‘चार’च्या पाऊणपट म्हणजे तीन. या तीनला तीन आकडय़ानेच गुणायचं उत्तर येईल नऊ. आता चतुर्थीच्या भरतीची वेळ साधारणपणे 3 वाजून 9 मिनिटे अशी असेल. तिथी द्वादशी (म्हणजे 12) असेल, तर बारा पावणेआठ अधिक बारा त्रिक छत्तीस म्हणजे द्वादशीची भरती 8 वाजून 36 मिनिटांनी असेल. या वेळा सकाळप्रमाणेच संध्याकाळच्याही असतात. कारण समुद्राला चोवीस तासात दोनदा भरती (…आणि अर्थातच ओहोटी) येत असते. याप्रमाणे अष्टमीची भरती 6 वाजून 24 मिनिटांनी आणि अमावस्या, पौर्णिमेची भरती सकाळी व रात्री बाराची असते. आता प्रश्न असा पडेल की, अमावस्या किंवा पौर्णिमेची तिथी होते पंधरा, त्यांच्या पाऊणपट म्हणजे पावणेअकरा, त्यामध्ये 45 मिनिटे (पंधरा त्रिक) मिसळली तरी साडेअकराच होतात. म्हणूनच सुरुवातीलाच या गणिताला साधारण म्हणजे अचूक नव्हे तर भरतीचा अंदाज येण्याइतपत सुमारे म्हटले. प्रत्यक्षात चंद्र रोज सुमारे 50 मिनिटे उशिरा उगवतो त्याचं योग्य गणित मांडलं तर भरती-ओहोटीची अचूक वेळ समजेल. ती पंचांगात नोंदलेली असते.

याहून मनोरंजक गोष्ट अशी की, चंद्र-सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम केवळ पृथ्वीवरच्या पाण्यावरच होतो असं नाही तर तो भूपृष्ठावर आणि वातावरणावरही होतो. या भूपृष्ठीय ‘भरती-ओहोटी’ला ‘क्लस्टल’ किंवा ‘सॉलीड अर्थ टाईड’ असं म्हणतात. सूर्य-चंद्रांच्या गुरुत्वाकर्षणाने पाण्याप्रमाणेच पृथ्वीचा जो पृष्ठभाग चंद्राच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेला असतो तेथे तो ‘पिंचित’ खेचला जातो. हे एवढं नगण्य असतं की, नुसत्या नजरेला दिसणं शक्य नसतं. तरीसुद्धा जमिनीची ही भरती-ओहोटी विषुववृत्तावर सुमारे 55 सेंटिमीटर इतकी असते.

तिसरी भरती-ओहोटी असते ती पृथ्वीवरच्या वातावरणाची. ती मात्र मोठीच असते. त्याचा परिणाम वातावरणाच्या आंदोलनात, वाऱयांमध्ये तसंच तापमानातही होतो. सूर्याच्या रोजच्या तापमानवाढीच्या आणि अस्ताला गेल्यावर घटण्याच्या चक्रामुळे वातावरणाला भरती-ओहोटी येते.

भूपृष्ठाला जी भरती-ओहोटी येते ती समुद्री पाण्याप्रमाणेच सूर्य-चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येते, तर वातावरणीय भरती-ओहोटी हा सूर्याच्या उष्णतेचा परिणाम असतो. भूपृष्टाची ‘क्लस्टल टाईड’ नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. मात्र ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिमद्वारा ती समजू शकते. या निरीक्षक उपग्रहांवर भूपृष्ठाचा कोणता भाग कोणत्या वेळी किती फुगीर झाला त्याची नोंद होते. त्यामुळे भूपृष्ठीय भरती-ओहोटी ही केवळ कल्पना नव्हे, तर सत्य आहे. गंमत म्हणजे आपल्या नकळत आपण आपल्या वस्त्या, शहरांसह यास भूपृष्ठीय भरतीचा आपोआपच एक भाग झालेलो असतो, पण आपल्या नकळत!