
मोटार वाहन विमा असल्यास चालकाचा अपघाती मृत्यू झाल्यावर भरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र उच्च न्यायालयाने एका चालकाच्या हत्येलादेखील ही भरपाई मान्य केली आहे.
हा चालक एका पिकअप गाडीवर कामाला होता. काम झाल्यानंतर गाडी एका झाडाखाली लावून तो आराम करत होता. तेथे चोरांनी त्याच्यावर हल्ला केला. यात या चालकाचा मृत्यू झाला. कामगार न्यायालयाने वाहन विमा कंपनीला चालकाच्या कुटुंबाला भरपाई देण्याचे आदेश दिले.
याविरोधात विमा कंपनीने याचिका दाखल केली. न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मोटार वाहन विमाअंतर्गत चालकाच्या हत्येसाठी भरपाई देता येत नाही, असा युक्तिवाद विमा कंपनीने केला.
वाहनासोबतच चालकालाही त्याच विम्याचे संरक्षण होते. चालकाचा अपघाती मृत्यू झाला नसला तरी कामावर असताना त्याचे निधन झाले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला भरपाई देण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश वैध आहेत, असे न्या. डिगे यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्याची साक्ष न नोंदवणे भोवले
वाहन विमाअंतर्गत केवळ चालकाच्या अपघाती मृत्यूलाच भरपाई मिळते हा दावा सिद्ध करण्यासाठी विमा कंपनीने त्यांच्या अधिकाऱयाची साक्ष नोंदवली नाही, असा ठपका न्यायालयाने ठेवला.






























































