
>> आशिष बनसोडे
वाहनांनी सदैव गजबजलेल्या जे जे उड्डाणपुलाखाली मुंबईची शान डबलडेकर बसेसमध्ये वाचनालय, कलादालन आणि उपाहारगृह सुरू करण्याचा अट्टहास गतवर्षी करण्यात आला होता. त्याप्रमाणे पालिकेने तीन डबलडेकर बसेस तीन वेगवेगळ्या ठिकाणी उभ्यादेखील केल्या; पण या तिन्ही बाबी सुरू करण्यास पालिकेला मुहूर्त सापडत नसल्याने या बसेस निव्वळ धूळ खात पडल्या आहेत.
जे. जे. उड्डाणपुलाखाली भेंडी बाजार, महात्मा फुले मंडई व जे. जे. इस्पितळ अशा तीन ठिकाणी हो हो बसेस उभ्या करण्यात आल्या असून त्या बसेसमध्ये कलादालन, वाचनालय व उपाहारगृह सुरू करण्याचे प्रस्तावित आहे; पण गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून यापैकी काहीच सुरू करण्यात आलेले नाही. एका नामांकित महाविद्यालयाकडे कलादालनाचा, तर एका महिला बचत गटाकडे उपाहारगृहाचा प्रस्ताव देण्यात आला होता; परंतु कुठूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने या तिन्ही हो हो बसेस धूळ खात उभ्या असून त्या अडचणीच्या वस्तू बनल्या आहेत.
मुळात संकल्पनाच चुकीची…
जे. जे. उड्डाणपुलाखाली हो हो बस कलादालन, वाचनालय व उपाहारगृह सुरू करण्याची संकल्पनाच चुकीची आहे. वाहनांची गर्दी असणाऱया या मार्गावर या सुविधा सुरू करण्यात अर्थ नाही. रस्ता ओलांडून त्या बसेसमध्ये वाचन करण्यास, कला प्रदर्शन बघण्यास किंवा खाण्यासाठी कसं जाणार? येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या ठिकाणांऐवजी समुद्रकिनारे अथवा पर्यटन स्थळी ही हो हो बस सुविधा करणे उचित ठरेल, असे खुद्द पालिका अधिकारीच म्हणत आहेत. हो हो बस सुविधा सुरू होईल असं वाटत नसल्याचेदेखील अधिकारी दबक्या आवाजात म्हणतात.
पुन्हा जाहिरात देणार
कलादालन, वाचनालय व उपाहारगृह सुरू करण्यास इच्छुकांनी पुढे यावे यासाठी पालिकेच्या संबंधित विभागाकडून लवकरच जाहिरात देण्यात येणार असल्याचे समजते. त्या जाहिरातीला प्रतिसाद देऊन कोणी पुढे आल्यास त्या सुविधा सुरू करण्यास मुहूर्त सापडेल असे अधिकारी सांगतात.



























































