
दिवट्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, चांगले शिक्षक मिळाले असते तर दिल्लीला जाऊन ‘बाबा, मला मारलं’ म्हणून लाचारी करावी लागली नसती, असा जोरदार टोला ठाकरे यांनी मिंध्यांना लगावला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “आयुष्यात चांगला शिक्षक आणि चांगले शिक्षण मिळाले नाही तर काय होते? दिवटी म्हणजे मशाल. पण काही दिवटे निघालेत; त्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही आणि कळणारही नाही. ही मराठी भाषेची गंमत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले आपले लोकप्रतिनिधी विधान परिषदेपर्यंत पोहोचून, कोणताही वाह्यातपणा न करता, शिक्षक म्हणून काम करताना आज वेगळा ठसा उमटवत आहेत. तुमचा आमदारकीचा निधी फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच वापरा.
आजच पेपरमध्ये वाचलं की एकजण दिल्लीला ‘बाबा, मला मारलं’ म्हणून गेला. ही लाचारी का? चांगले शिक्षक मिळाले असते तर या वयात अशी वेळ आली नसती,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“शिवसेनाप्रमुखांना आणि माझ्या आजोबांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. दोघांनाही सातवीत फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे शाळा सोडावी लागली. पण शाळा सुटली तरी त्यांचे शिक्षण थांबले नाही. कारण घरात ‘संस्कार’ हा एक विषय असतो.आईवडील आपल्या वागणुकीतून मुलांना संस्कार देतात. आपण जसे वागतो, तसेच मुलं वागतात, आणि त्यातूनच घराणेशाही निर्माण होते. वडिलांनी घोटाळा केला तर मुलगा त्याहून मोठा घोटाळा करणार.या सगळ्या गोष्टी संस्कारातून येतात,” असेही ते म्हणाले.
“टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली की 2014 च्या निवडणुकीत शिवसेना भवनातील एका पत्रकार परिषदेत मी आठवीतील एका विद्यार्थ्याचे भरलेले दप्तर दाखवले. पत्रकारांना ते उचलायला सांगितले तेव्हा त्यांनी ते जड असल्याचे सांगितले. मग मी एक SD कार्ड दाखवून सांगितले की या संपूर्ण दप्तरातील अभ्यासक्रम मी त्या SD कार्डात टाकला आहे. ते SD कार्ड टॅबमध्ये टाकून आपण महापालिका शाळांमध्ये आठवी ते दहावीपर्यंत ही सुविधा सुरू केली होती. आता ती सुरू आहे की नाही, मला माहिती नाही. कारण गेल्या तीन–चार वर्षांत महापालिकेचा बाप कोण हेच कळत नाही. लुटालुटीचे काय चालले आहे तेही कोणाला कळत नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“15 दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात फिरलो. गेल्या वर्षी महाराष्ट्रभर अतिवृष्टीमुळे आपत्ती निर्माण झाली. 70,80,90 वर्षांचे शेतकरी सांगत होते की इतका पाऊस त्यांनी आयुष्यात कधी पाहिला नव्हता. अनेक ठिकाणी नदीपात्रातून आलेल्या पाण्याने जमीन, घरं, शेती वाहून गेली. अशा परिस्थितीत शेतकरी विचारू लागले.खायचं काय? त्यांना धीर देण्यासाठी मी फिरलो आणि त्यांचं म्हणणं ऐकलं. एका महिलेने उद्वेगाने सांगितलं की ‘मुलींना फुकट शिक्षण म्हणतात, पण माझ्या मुलींना शिकवायला गेलं तर फी भरावी लागते. आम्ही काहीच उरलं नाही. शिकवायचं कसं?’ तिच्या डोळ्यात पाणी होतं.राग, उद्वेग, आणि वेदना. मग आम्ही त्या महिलेच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. नंतर तिला बोलावलं तर ती म्हणाली, ‘साहेब, मी माझं नाही, माझ्या गावाचं दुःख सांगितलं. अशा अनेक मुलं–मुली आहेत.’”
“अभ्यंकर साहेब, तुम्ही मुंबईच्या शिक्षकांचे प्रतिनिधित्व करता. तुमचा निधी अल्प असला तरी तुम्ही तो वापरत आहात. पण महाराष्ट्रातील इतर शाळांकडे कोण पाहणार? आम्हाला वेळ नाही. आमची जबाबदारी मुलांना शिकवण्याची नाही.आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार–खासदार फोडायचे. खुर्चीवर बसलो की बाकीचं जग जाऊ दे. मग लोक नुसत्या ‘रेवड्यां’वर भुलून चुकीची माणसं निवडतात. त्यापेक्षा लोकांनी योग्य निवड कशी करावी हे शिकवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे.”
“आमच्या घराण्याची परंपरा पाहिली तर माझ्या आजोबांची आई.त्यांची आजी.हे सगळे शाळेत जास्त शिकलेले नव्हते, पण विचारांनी आणि संस्कारांनी पक्के होते. एकदा आजोबांच्या आईला शाळेत बोलावले होते. शिक्षक म्हणाले.‘केशव अभ्यासात कच्चा आहे, तयारी करून घ्या.’ त्यावर आजोबांच्या आईने सांगितलं.‘आम्ही शाळेत धोंडा पाठवतो, शेंदूर फासण्याचं काम शिक्षकांनी करायचं!’ पालकांनी आपलं काम करावं.चांगली शाळा, चांगले शिक्षक, चांगले संस्कार द्यावेत.”
“इंटरनेटवर माहिती मिळते, पण माहितीला अनुभवाची जोड मिळाली की ती ज्ञानात रूपांतरित होते. त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर करून चांगल्या मूर्ती घडवण्याचं काम तुमचं आहे. या कामासाठी आमच्याकडून जे काही लागेल, ते आम्ही यथाशक्ती करू.ही एकच हमी मी तुम्हाला देतो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.



























































