मी भाजमपध्ये नाही हे रत्नागिरीत येऊन सांगायची गरज नव्हती, राजेश सावंत यांचा रवींद्र चव्हाणांना टोला

मी भाजप पक्षाचा भाग नाही हे सांगायला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरीत यायची गरज नव्हती. मुंबईतून जरी सांगितले असते तर मी माझ्या भाजप प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला असता, असे भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले.

राजेश सावंत यांची सुकन्या शिवानी सावंत-माने या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यापूर्वी राजेश सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. बुधवारी रत्नागिरीत महायुतीचा मेळावा झाला त्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजेश सावंत हे भाजपचा भाग नसल्याचे भाषणात सांगितले. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राजेश सावंत यांनी आपली भूमिका मांडली. राजेश सावंत म्हणाले की, मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला नव्हता. मला जर प्रदेशाध्यक्षांनी फोन करून प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा द्या असे सांगितले असते तर मी तो ही राजीनामा तात्काळ दिला असता. सहा तासांचा प्रवास करून इथे आणून राजेश सावंत भाजप पक्षाचा आता भाग नाही हे सांगायची गरज नव्हती असे राजेश सावंत स्पष्टपणे म्हणाले.

आता मी माझ्या मुलीचा प्रचार करणार

मी आता भाजप पक्षात नाही हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत येऊन जाहीर केल्यामुळे मी आता माझी मुलगी नगराध्यक्षपदाची उमेदवार शिवानी सावंत-माने हिचा प्रचार करायला मोकळा झालो आहे. मी आजपासून शिवानीचा प्रचार करणार असल्याचे राजेश सावंत यांनी सांगितले.