
गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव देवीच्या मंदिर प्रांगणामध्ये उत्साहात पार पडला. या वेळी भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा घेणाऱ्या बगाडा सोहळ्यासाठी मुंबई, पुणे व राज्यभरातून आलेले पर्यटक तसेच भक्तांनी गर्दी केली होती. सुरुवातीला देवीचा मानाचा आकडा देवीचे मानकरी मदन नरवणकर (कुंभार) यांनी टोचून घेतला. त्यानंतर नवसाचे आकडे टोवण्यात आले. हा थरार जमलेल्या हजारो भाविकांसाठी लक्ष्यवेधी ठरला.
नरवण येथील श्री व्याघ्रांबरी देवीचा देवदिवाळीतील बगाडा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कार्तिक दर्श अमावस्येला (देवदिवाळी) मोठी जत्रा भरते. सुमारे 25 फूट उंचीवर ठेवलेल्या 40 फूट लांबीच्या लाकडी लाटेला एका बाजूला दोरी असते, तर दुसऱया बाजूला लोखंडी आकडे असतात. हे आकडे मानाच्या व नवस फेडणाऱया भाविकाच्या पाठीवर टोवले जातात. त्यानंतर दोराने लाट खेचून त्या भाविकाला जमिनीपासून 25 फूट उंचीवर नेऊन अधांतरी फिरवले जाते. या वेळी नवस फेडणाऱया भाविकाच्या एका हातात घंटा व दुसऱ्या हातात तांदूळ असतात, तर मुखात देवीचा नामघोष करत, ‘‘आकडे टुपले, नवस पावले’’ असा जयघोष सुरू असतो. यालाच परंपरेने ‘बगाडा’ असे म्हणतात.




























































