“सरकारच्या कारभारात ढवळाढवळ करत नाही, पण मणिपूरमध्ये…”, सरसंघचालक मोहन भागवत स्पष्टच बोलले

गेल्या अडीच वर्षापासून मणिपूर धगधगत आहे. कुकी आणि मैतेई समाजात उसळलेल्या हिंसाचारामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोकांनी स्थलांतर केले आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट असून परिस्थिती नियंत्रणात असली तरी कधी काय होईल सांगता येत नाही. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरचा धावता दौरा केला होता आणि आता सरसंघचालकही हिंसाचारानंतर पहिल्यांदा मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. राजधानी इम्फाळमध्ये आयोजित एका मेळाव्यात बोलताना त्यांनी मणिपूरबाबत मोठे विधान केले.

सरकार आणि राजकीय पक्षांच्या कारभारामध्ये मी ढवळाढवळ करत नाही. परंतु मणिपूरमध्ये सरकार असायलाच हवे आणि ते स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मोहन भागवत म्हणाले. मणिपूरमध्ये मे 2023 पासून दोन समाजात उसळलेल्या जातीय हिंसाचारात 260 जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. याची जबाबदारी घेत फेब्रुवारी महिन्यात एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपटी राजवट लागू झाली.

विनाशासाठी फक्त दोन मिनिटे पुरेसे आहेत, परंतु निर्माणासाठी दोन वर्ष लागतात. या कठीण परिस्थितीत मणिपूरच्या लोकांना वेगवेगळ्या मार्गांनी विभाजित होण्यापासून रोखण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ. भौतिक शांतता लवकर होईल, पण अंतर्गत शांततेसलाठी थोडा वेळ लागेल, याची आम्हाला जाणीव आहे, असेही मोहन भागवत म्हणाले.

“कोणास ठाऊक 2047 मध्ये…”

आपला देश जगाच्या कल्याणासाठी अस्तित्वात आला. आपले जीवन जगभरातील लोकांना प्रेरित करते. आपली परंपरा हिंदू परंपरा म्हणून ओळखली जाते. आपल्या देशाचे आकारमान बदलत राहिले आहे. 1947 पूर्वी हिंदुस्थान मोठा देश होता, पण आता तितका मोठा नाही. कोणास ठाऊक 2047 मध्ये पुन्हा तो मोठा होईल. भौगोलिक सीमा काळानुसार बदलतात राहतात. परंतु हिंदुस्थान सदैव होता आणि सदैव राहील, असेही मोहन भागवत म्हणाले.

पंतप्रधान मोदींची पाठ फिरताच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पोलीस ठाण्यात जमावाचा घुसण्याचा प्रयत्न