सर्व 140 आमदार माझेच आहेत! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा मोठा दावा

कर्नाटकात सत्ताबदलाच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मोठा दावा केला आहे. राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये कोणताही अंतर्गत संघर्ष नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या “नोव्हेंबर क्रांती” चर्चेबद्दल आणि आमदारांच्या दिल्ली भेटीबद्दल सुरु असलेल्या चर्चांवरही शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकात “नोव्हेंबर क्रांती” आणि आमदारांच्या दिल्ली भेटीबाबत विविध चर्चा सुरू आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सविस्तर माहिती दिली दिले आहे. शिवकुमार म्हणाले की, आमदारांचा दिल्ली दौरा हा गटबाजीचे लक्षण नाही. सर्व १४० आमदार माझेच आहेत. गट तयार करणे माझ्या स्वभावात नाही. मुख्यमंत्री आणि मी नेहमीच हायकमांडच्या निर्णयाशी पूर्णपणे वचनबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

काही आमदारांचा दिल्ली दौरा हा कोणत्याही राजकीय दबावाचे किंवा गटबाजीचे लक्षण नाही. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी नेतृत्वाला भेटण्याची एक सामान्य राजकीय पद्धत होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री होणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, म्हणून आमदारांनी नेतृत्वाला भेटणे अगदी सामान्य आहे. आम्ही कोणालाही थांबवू शकत नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पूर्ण पाठिंबा दर्शवताना शिवकुमार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की ते त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत एकत्र काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या आठवड्यात शिवकुमार समर्थक मानले जाणारे अनेक आमदार अचानक दिल्लीला गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली की कर्नाटकात नेतृत्व बदल होत आहेत. काही नेत्यांनी याला “नोव्हेंबर क्रांती” असेही म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवकुमार यांनी मोठा दावा करत इतर सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.