
अल्पवयीन मुलाच्या अपघाती मृत्यूचे भांडवल करून कोणतेही पालक भरपाई मागणार नाहीत, असे खडे बोल सुनावत उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला चांगलीच चपराक लगावली. पीडिताच्या कुटुंबाला आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला दिले.
या 17 वर्षीय मुलाचा प्रभादेवी व लोअर परळ स्टेशनदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. लालबागला गणेश दर्शनासाठी हा मुलगा मित्रांसोबत जोगेश्वरी येथून लोकलने येत होता. नुकसानभरपाईसाठी त्याच्या कुटुंबाने रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरणाकडे अर्ज केला. न्यायाधिकरणाने नुकसानभरपाई नाकारली. त्याविरोधात आईवडिलांनी याचिका दाखल केली.
न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने न्यायाधिकरणाचा निकाल रद्दबातल ठरवला. या पालकांना आठ आठवडय़ांत भरपाई देण्याचे आदेश न्या. जैन यांनी दिले.
पैशाने मुलगा परत येणार नाही
लहान मुलाच्या मृत्यूमुळे पालकांचे होणारे नुकसान अकल्पनीय आहे. ते पैशाने भरून काढता येत नाही. गणपती दर्शनासाठी जात असताना मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यास किरकोळ भरपाईसाठी पालक दशके खटला चालवत नाही. भरपाई ठरवताना या मुद्दय़ाचा विचार व्हायला हवा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
जीव वाचवण्याला प्राधान्य दिले जाते
हा अपघात झाला तेव्हा पीडित मुलाचे मित्र तो पडला तेथे गेले. तेथून त्यांनी त्याला केईएम रुग्णालयात नेले. तेथे
डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे या घटनेची पोलिसांत नोंद केली गेली नाही हा प्रशासनाचा दावा मान्य केला जाऊ शकत नाही. कारण अशा परिस्थितीत पीडिताचा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे असते, असेही न्यायालयाने नमूद केले.
17 वर्षांची प्रतीक्षा
जयदीप तांबे असे या मुलाचे नाव आहे. 5 सप्टेंबर 2008 रोजी त्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. प्रवाशांच्या गर्दीमुळे ही घटना घडली. त्याच्या पालकांनी नुकसानभरपाईसाठी केलेला अर्ज 2016 मध्ये अपघात न्यायाधिकरणाने फेटाळला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. घटनेच्या 17 वर्षांनी न्यायालयाने या पालकांना भरपाई मंजूर केली.





























































