Ashes 2025 – हॅट्स ऑफ स्टार्क… स्वत:च्याच गोलंदाजीवर घेतला अविश्वसनीय कॅच, व्हिडीओ पाहून तुम्हीही टाळ्या वाजवाल

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर अॅशेस मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. पर्थच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आग ओकत आहेत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, तर इंग्लंडकडून बेन स्टोक्सने दमदार गोलंदाजी केली. यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 172, तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 132 धावांमध्ये आटोपला.

इंग्लंडला 40 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. अर्थात हा आनंद जास्त काळ टिकला नाही आणि स्टार्कने इंग्लंडला दुसऱ्या डावातही पहिल्याच षटकात धक्का दिला. इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्राऊली याला स्टार्कने स्वत:च्या गोलंदाजीवर अविश्वसनीय कॅच घेत शून्यावर माघारी पाठवले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ‘हॅट्स ऑफ स्टार्क’ असे उद्गार क्रीडाप्रेमींच्या मुखातून बाहेर पडत आहेत.

मिचेल स्टार्कने पहिल्या षटकात विकेट घेण्याची परंपरा कायम राखत क्राऊलीला माघारी धाडले. स्टार्कचा चेंडू समोरच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न क्राऊली करतो, मात्र चेंडू बॅटला लागून हवेत उडतो. इतक्यात स्टार्क फॉलो थ्रूमध्ये डाव्या बाजूला झेप घेतो आणि एका हाताने अविश्वसनीय कॅच घेतो. अर्थात कॅच व्यवस्थित पकडला की नाही हे पाहण्यासाठी मैदानावरील पंच तिसऱ्या पंचांकडे इशारा करतात. मात्र रिप्लेमध्ये स्टार्कने चेंडू नीट पकडल्याचे स्पष्ट होते आणि मैदानावरील मोठ्या स्क्रिनवर आऊट असे लिहून येते. यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एकच जल्लोष करताना दिसतात.

Ashes 2025 – खेळपट्टीवरून ‘डबल ढोलकी’ वाजवणाऱ्यांना अश्विनने बदडून काढले, पर्थचा दिला दाखला