गाथेच्या शोधात – काळ हाच खरा न्यायाधीश

>> विशाल फुटाणे

कधी कधी एखादा शिलालेख इतिहास नोंदवण्यापेक्षा समाजाला आरसा दाखवतो. नैतिकतेचे धडे दगडातही कोरले जाऊ शकतात हे सांगणारा हा शालालेख आहे कर्नाटकातील केसरबावी येथे सापडलेला राष्ट्रकूटकालीन शिलालेख. हा दस्तऐवज म्हणजे एक ‘शापलेख’च आहे.

भारतीय शिलालेख म्हटला की, आपल्या डोळ्यांसमोर येतात राजे-महाराजांच्या दान, शासनाच्या कथा, मंदिरांची स्थापना, राजकीय विजयाचे जयघोष. पण कधी कधी एखादा शिलालेख इतिहास नोंदवण्यापेक्षा समाजाला आरसा दाखवतो आणि सांगतो की, नैतिकतेचे धडे दगडातही कोरले जाऊ शकतात. कर्नाटकातील बागलकोट जिह्यातील हुनगुंद तालुक्यातील केसरबावी येथे सापडलेला इ.स. 837 सालचा राष्ट्रकूटकालीन शिलालेख हा तसाच एक विलक्षण दस्तऐवज आहे. हा न कुठल्या भूमिदानाचा आहे, न मंदिर स्थापनेचा, न राजकीय पराक्रमाचा. तर तो आहे एक ‘शापलेख’.

शापलेख म्हणजे तरी काय? समाजाने एखाद्या व्यक्तीला कायमचा धडा शिकवण्यासाठी, सार्वजनिकरीत्या लज्जास्पद ठरवण्यासाठी दगडावर कोरलेले आरोपपत्र! न्यायालयीन शिक्षा वेगळी असायची, पण दगडावर कोरलेला शाप हा कायमचा असायचा. त्या काळातील लोकांच्या नजरेतून एकदा अपराधी ठरलात की, पिढय़ान्पिढय़ा तुमचे नाव दोषी म्हणूनच वाचले जायचे.

या शिलालेखात ‘सत्तियसी’ नावाच्या व्यक्तीवर गंभीर आरोप आहेत. त्याचा मुख्य आरोप हा की, त्याने सती जाणाऱया स्त्राrला थांबवलं, सती प्रथेचे समर्थन करणाऱया ब्राह्मणांची हत्या केली, तलाव नष्ट केले. त्याचे हे कृत्य मातृगामीपणाचे लक्षण ठरवत सती प्रथेला विरोध केला म्हणून त्याच्यावर घृणास्पद आरोप जाणीवपूर्वक लावले गेले. शिलालेखात थेट लिहिले आहे, ‘तो नरकात कीटकासारखा राहो, चंद्रसूर्य अस्तित्वात असतील तोवर त्याचे पाप स्मरणात राहो.’ असे शब्द कोरून त्याला अपराधी ठरवले गेले. हे वाचून प्रश्न पडतो की, हे आरोप का लावले? समाजाने त्याला जाहीरपणे कलंकित करण्यासाठी ही लांच्छनं का जोडली? त्या काळी सती प्रथा ‘पवित्र’ मानली जायची. अशा वेळी सतीला रोखणे म्हणजे परंपरेला विरोध आणि समाजाच्या नजरेत तो अपराध, पण आज आपल्याला हीच कृती उलट धैर्य, संवेदनशीलता आणि सुधारक वृत्ती वाटते. सती जाणाऱया स्त्राrचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा पुरुष त्या काळी गुन्हेगार मानला गेला, पण आज त्याच कृतीला आपण मानवतेचा विजय मानतो. त्यात उल्लेखलेला आई-बहिणीवरील संबंधाचा आरोप बहुधा अतिशयोक्तीच होता. व्यक्तीला कायमचे बदनाम करण्यासाठी लावलेला कलंक. कारण समाजाला ठाऊक होते की, दगडावर कोरलेला लांच्छन शतकानुशतके टिकतो आणि त्या व्यक्तीच्या स्मृतीवर कायमचा डाग ठेवतो.

‘सत्तियसी’ या नावावर कोरलेला शाप, लांच्छन आणि अपमान 1200 वर्षे टिकून राहिला. पिढय़ान्पिढय़ा लोकांनी दगडावर वाचलेला तो आरोप खरा मानला, पण काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश असतो. त्या काळी जी कृती अपराध मानली गेली, आज त्याच कृतीत आपल्याला समाज सुधारणा दिसते. सतीला थांबविणारा हात तोपर्यंत अपराध ठरला, पण आज मात्र तोच हात जीवन रक्षण आणि धैर्याचे प्रतीक वाटतो. ‘केसरबावी’चा हा शिलालेख आपल्याला सांगतो की, दगड केवळ दान वा विजयाची साक्ष देत नाही. तो समाजाची मानसिकता आणि नैतिकतेची व्याख्या जपतो. लांच्छन कायम राहते, पण त्याचा अर्थ काळानुसार बदलतो. जो कधी अपराधी ठरला तोच इतिहासाच्या नजरेत सुधारक होऊ शकतो. शिलालेख आपल्याला दाखवतो की, समाजाचा विवेक कसा बदलतो. एका काळात दोष मानलेले दुसऱया काळात गुण ठरू शकते.

हिंदू धर्म हा प्रवाही आहे. काळानुरूप त्याची मानसिकता बदलते. हिंदू समाजात सुधारणेला स्थान आहे, नव्या विचारांचे स्वागत आहे. प्राचीन समाजात जे काही अपराध किंवा कलंक मानले जात होते, ते आजच्या दृष्टीने पुनर्विचाराचा विषय ठरतात. शापलेखातील लांच्छनाचा भार दगडावर कोरलेला होता, पण काळानुसार त्याची व्याख्या बदलली. हिंदू मानसिकता ही एवढी लवचिक आहे की, ती अज्ञानाच्या कलंकाला धैर्याच्या आणि सुधारक वृत्तीच्या प्रकाशात बदलू शकते. यामध्ये दिसते की, धर्म केवळ स्थिर नियमांचा संच नसतो. तो समाजाच्या मूल्य, नैतिकता आणि विवेक यांच्याशी सतत संवाद साधतो.

विशेषत इंग्रजी वसाहत काळात सती प्रथेविरोधात राजा राममोहन रॉयसारख्या सामाजिक सुधारकांनी आंदोलन उभे केले, कायदे केले गेले आणि अखेर या प्रथेवर बंदी आली, पण आश्चर्याची बाब म्हणजे अशा सुधारक विचारांची बीजे भारतात त्याच्या हजार वर्षे आधीच रोवली गेली होती. इ.स. 837 मध्ये केसरबावीच्या शिलालेखात दिसणारी सत्तियसी ही व्यक्ती सती जाणाऱया स्त्राrला थांबविण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्या काळातही कोणीतरी या अमानवी प्रथेविरुद्ध उभा राहिला होता.

त्या काळात समाजाने परंपरेला ‘धर्म’ मानले, पण तरीही सत्तियसीचे कृत्य हे भारतीय समाजात मानवतेचा आणि स्त्रीजीवनाच्या पवित्रतेचा पहिला आवाज होता, असा पुरावा हा शिलालेख देतो. त्यामुळे सती प्रथेविरोधातील सुधारक विचार केवळ आधुनिक नव्हते तर त्यांची मुळे भारतीय विवेक आणि करुणेच्या प्राचीन परंपरेत खोलवर रुजलेली होती.

1200 वर्षे सत्तियसी पापी म्हणून ओळखला गेला, पण काळाने त्याचे अपराधाचे ओझे धुऊन काढले आणि त्याचे रूपांतर एका सुधारकात केले. खरा शाप त्याच्या कृतीत नव्हता, तर समाजाच्या अज्ञानात होता. आज आपण मागे वळून पाहतो तेव्हा असे म्हणता येईल की, लांच्छन दगडावर कोरले पण इतिहासाने ते धुऊन काढले. अपराध्याऐवजी तो सुधारक ठरला आणि शेवटी काळच खरा न्यायाधीश ठरला.
(लेखक इतिहास व पुरातत्त्व संशोधक आहेत.)

[email protected]