
>> अक्षय मोटेगावकर
डॉ. आनंद नाडकर्णी यांना वाचणे म्हणजे स्वतमध्ये खोल आत दडलेल्या कोलाहलाचे मूळ शोधण्यासारखे आहे. ‘आवाहन आयपीएच’ या यूटय़ूब चॅनेलद्वारे डॉ. नाडकर्णी हे मूळ शोधायला तर मदत करतातच, पण तो कोलाहल शांत करायलादेखील मदत करतात. माणूस म्हणून समृद्ध व्हायचे असेल तर हे चॅनेल तुमची भरपूर परतावा देणारी इन्व्हेस्टमेंट ठरणारे आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचे नाव माहीत नाही असा मराठी वाचक नसेल. त्यांच्या ‘स्वभावविभाव’, ‘शहाण्यांचा सायकिआट्रिस्ट’, ‘विषाद योग’, ‘कर्मधर्म संयोग’ किंवा ‘गोंदणखुणा’ यांसारख्या पुस्तकांपैकी एक तरी पुस्तक त्याने कधी ना कधी वाचलेच असेल. यापैकी ‘स्वभावविभाव’ आणि ‘विषाद योग’ ही माझी आवडती पुस्तके. ही पुस्तके, त्यातील काही प्रकरणे ही पुन्हा पुन्हा वाचली आहेत. डॉ. आनंद नाडकर्णी यांना वाचणे म्हणजे स्वतमध्ये खोल आत दडलेल्या कोलाहलाचे मूळ शोधण्यासारखे आहे. डॉ. नाडकर्णी हे मूळ शोधायला तर मदत करतातच, पण तो कोलाहल शांत करायलादेखील मदत करतात.
डॉ. आनंद नाडकर्णी एमबीबीएस करून मनोविकार शास्त्रात एमडी झाले. असंख्य मनोविकारांच्या केसेस त्यांनी पाहिल्या. कित्येक रुग्णांना बरे केले. हे व्रत काही रुग्णांपुरतेच मर्यादित न ठेवता ते समाजाभिमुख आणि समाजकेंद्रित झाले पाहिजे या ध्यासातून त्यांनी इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थची (घ्झ्प्) स्थापना केली, पण फक्त मनोविकार या विषयापर्यंतच आपली आवड मर्यादित ठेवतील तर ते डॉ. नाडकर्णी कसले? त्यांनी विविध विषयांचा अभ्यास केला. त्यात हिंदू पुराणशास्त्र, उक्रांतीचे मानसशास्त्र, जागतिक आणि भारतीय इतिहास, जागतिक चित्रपट आणि लेखन अशा अनेक विषयांचा अभ्यास केला. मैत्र, वेध, जिज्ञासा यांसारख्या प्रकल्प / कार्यक्रमांद्वारे ते समाजातील सत्प्रवृत्तींना अधोरेखित करण्याचे, त्यायोगे काही सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळेच डॉ. आनंद नाडकर्णींचे व्याख्यान किंवा भाषण ऐकायला मिळणे ही पर्वणी ठरते.
डॉक्टरांचा अभ्यास जरी क्लिष्ट विषयातील असला तरी त्यांची ते समजावून सांगण्याची शैली अत्यंत सोपी आणि रसाळ आहे. फक्त रुग्णांना बरे करणे हा एकमात्र हेतू ना ठेवता समाजमन हे कसे निकोप विकसित होईल याकडे डॉक्टरांनी सदैव लक्ष दिले आणि मनोविकार तज्ञापासून ते मनोविकास तज्ञ हा प्रवास त्यांनी साध्य केला. त्यामुळेच ज्या वेळी त्यांच्या ‘आवाहन आयपीएच’ या यूटय़ूब चॅनेलची माहिती कळली. त्यामुळे ते दुर्लक्षित राहणे शक्यच नव्हते. विविध विषयांवरचे अत्यंत दर्जेदार पॉडकास्ट, मुलाखती येथे पाहायला मिळतात.
मध्यंतरी एक बातमी वाचनात आली की, चीनमध्ये टिकटॉक या अतिशय प्रसिद्ध अशा समाजमाध्यमावर तुम्हाला एखाद्या विषयावरचे व्हिडीओ करायचे असतील तर त्या विषयातील तुमचा अभ्यास हवा. तुम्ही त्या विषयाचे रीतसर पदवी शिक्षण तरी पूर्ण केलेले असावे, पण सद्यस्थिती पाहता भारतात कोणीही व्यक्ती कोणत्याही विषयावर बोलत आहे. त्या विषयाचा आपला अभ्यास आहे का, आपण जे विचारले जात आहे ते शिकलो, अभ्यासले आहे का? हा विचार न करता बरेच वत्ते त्यांना जे वाटेल ते बोलून जातात.
‘आवाहन आयपीएच’च्या चॅनेलवर मात्र फार सकस आणि अभ्यासपूर्ण कन्टेन्ट मिळतो. इथे ‘ओ रे मनवा’ नावाची स्व-शोधाची सीरिज पाहायला मिळते, चित्रपटांतून आत्मशोधाचा प्रवास पाहायला मिळतो, ग्रामीण भागातून संघर्षाची दिवटी हाती घेऊन निघालेल्या वैभव सोनोणेंची कहाणी कळते. यातील काही मुलाखती तर अगदी न चुकवण्यासारख्या आहेत. ज्येष्ठ मनोविकार तज्ञ, लेखक आणि शरीरस्वास्थ्याचे पुरस्कर्ते डॉ. नंदू मुलमुले, ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे, आहारतज्ञ ऋजुता दिवेकर, आनंद पर्यावरण योद्धा मल्लिगेवाडी यांच्या मुलाखती आवर्जून ऐकाव्या अशा आहेत. माणूस म्हणून समृद्ध व्हायचे असेल तर हे चॅनेल तुमची भरपूर परतावा देणारी इन्व्हेस्टमेंट असणार आहे.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)


























































