
एकाधिकारशाही आणि अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत. रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती आणि 2 तारखेला कार्यकर्त्यांनी तेच करायचे आहे, असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता दिले.
डहाणू नगर परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजपूत यांना शिंदे गटाने आव्हान दिले असून शिंदे गटाचे राजेंद्र माच्छी निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना होणार आहे. माच्छी यांच्या प्रचार सभेत भाषण करताना अहंकाराविरोधात आपण लढत आहोत असे सांगत शिंदे यांनी रावणाच्या अहंकाराचे उदाहरण दिले. ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत भाजपने शिंदे गटात फोडफोडी करून अनेकांना भाजपात प्रवेश दिला. त्यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. याच मुद्दय़ावरून शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मोठय़ा रकमा देऊन माझी माणसे फोडली जात आहेत, अशी तक्रारच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शहांकडे केली होती. त्यानंतर शिंदे यांनी आज प्रथमच भाजपवर अप्रत्यक्ष टीकेचे बाण सोडले.
रावणापेक्षाही भाजपला अहंकार जास्त – हर्षवर्धन सपकाळ
तुम्ही सत्तेत असून सत्तेची तुम्हाला एवढी हाव आहे की, तुम्ही निवडणुकाही होऊ देत नाही. भाजपला रावणापेक्षाही जास्त अहंकार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
बीड जिह्यात सत्ताधारी पक्षाने उच्छाद मांडला आहे. त्यांच्या गुंडगिरीने बीड जिह्याचे नाव बदनाम झाले आहे. ही विकृती आता थांबवली पाहिजे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत ताकदीने लढत आहे, तर महायुतीमधील पक्षच आपापसात लढत आहेत. गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरू असल्याचा टोला सपकाळ यांनी लगावला. महायुतीचा महाराष्ट्रात नंगानाच सुरू असून त्यांनी लोकशाहीला काळिमा फासला आहे, असे ते म्हणाले.





























































