अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर राडा, काँग्रेस कार्यकर्ते भाजपला भिडले

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. साटम यांनी काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्यावर कठोर शब्दात  केलेल्या टीकेच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंधेरी पश्चिम येथील भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

कॉँग्रेस नेते अस्लम शेख यांनी भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना धमकावल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आज भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी इथे आधीपासूनच बॅरिकेटिंग लावून ठेवले होते. पण तरीही काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला.

अमित साटम काय म्हणाले होते

अस्लम शेख यांच्यासारख्या पाकिस्तानच्या औलादींना आम्ही अजिबात भीक घालत नाहीत. त्यांनी मालाडमध्ये ज्याप्रकारे मालवणी पॅटर्न चालवला आहे तो उखाडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. येणाऱ्या काळात ही हिरवी पिलावळं या मुंबईत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे वक्तव्य अमित साटम यांनी केले होते.