
>> शीतल धनवडे
कागल नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे हाडवैरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे यांची अनपेक्षित युती झाली. दुसरीकडे मुश्रीफ आणि शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यात कमालीची जुंपली आहे. यात ‘कोणाला वाड्यावरील आरक्षण, तर कोणाला ईडीपासून सुटका’, अशी मंडलिक यांची टीका जिव्हारी लागल्याने, मुश्रीफ यांनीही मंडलिक यांना तोंड सांभाळून बोलण्याचा इशारा दिला आहे.
कागलच्या विकासासाठी ही युती करणारी ती अदृश्य शक्ती म्हणजे खुद्द मुख्यमंत्रीच असल्याचा गौप्यस्फोट आता मंत्री मुश्रीफ यांनी केल्याने, कागलमध्ये विकासाऐवजी बिघडलेल्या शांततेमुळे कार्यकर्ते आणि जनताच सैरभैर झाली आहे. मुश्रीफ, मंडलिक आणि घाटगे यांचा हा राजकीय संघर्ष पाहता, कागलचे राजकारण आता कोणत्या थराला जाईल, या भीतीने कागलकरही धास्तावले आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यातील टोकाचा संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. ‘ईडी’च्या कारवाईनंतर महायुतीत गेल्याने मुश्रीफांचा फास सैल झाला, पण ज्यांच्यामुळे ही वेळ आली ते समरजित घाटगे यांचे विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर पुन्हा भाजपमध्ये परतण्याचे दोर कापण्यासाठी संजय घाटगे यांना भाजपमध्ये पद्धतशीरपणे घुसवून त्यांच्या मुलाला जिल्हा बँकेत संचालकही करून टाकले. त्यामुळे समरजित घाटगे यांची राजकीय कोंडी झाली असे वाटत असतानाच, आता कागल नगरपरिषद निवडणुकीत अचानक मुश्रीफ आणि घाटगे यांची युती झाली. त्यामुळे भाजपने इच्छुकांना दिलेले एबी फॉर्म परत घ्यावे लागले, तर शिंदे गटाने मंडलिकांना बाजूला केले. एवढ्यावरच न थांबता, मुश्रीफांनी मंडलिक यांच्या एका उमेदवाराला माघार घ्यायला लावून, स्वतःच्या घरातील सुनेला बिनविरोध निवडून आणले.
मुश्रीफ आणि घाटगे यांच्या या राजकीय खेळीने बाजूला फेकले गेलेल्या मंडलिक यांनी या दोघांना डिवचले. या कट्टर विरोधकांच्या युतीमागे कागलचा विकास व जनहिताचा कोणताही हेतू नाही. एका नेत्याला (समरजित घाटगे) त्यांच्या गैबी चौकातील वाड्यावरील आरक्षण उठवायचे आहे, तर दुसऱ्याला (मुश्रीफ) ईडीच्या चौकशीतून सुटका मिळवायची असल्याची मंडलिकांची टीका मुश्रीफ यांच्या जिव्हारी लागली. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुठे आणि संजय मंडलिक कुठे?, जर संजय मंडलिक यांच्यावर बोललो तर ‘बात दुर दुर तक’ जाईल. त्यामुळे त्यांनी तोंड सांभाळून बोलावे, असा इशारा दिला, तर ईडीबाबत मंडलिक यांना अज्ञानी ठरवून, आपली यातून कधीच सुटका झाल्याचे मुश्रीफ यांनीच सांगून टाकले आहे. तसेच समरजित घाटगे यांच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीच्या एका तुकड्यासाठी त्यांना हा निर्णय घेण्याची गरज नाही. तालुक्यात शांतता नांदावी व जनहितासाठीच हा निर्णय घेतल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले असले तरी यावर समरजित घाटगे यांनी अजूनही मौन बाळगले आहे.

























































