“थेट युद्ध करण्याची हिंमत नाही म्हणून…”, दिल्लीतील आत्मघाती स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकड्यांवर हल्लाबोल

पाकिस्तानला आता कळून चुकले आहे की, ते थेट युद्धात हिंदुस्थानला हरवू शकत नाही. म्हणते ते प्रॉक्सी वॉरद्वारे हिंदुस्थानमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीतील बॉम्बस्फोट हा त्या प्रयत्नांचा एक भाग होता, असे विधान हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले. ते नवी दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, पाकिस्तानला आता हे कळून चुकले आहे की, ते थेट युद्धामध्ये हिंदुस्थानला हरवू शकत नाहीत. म्हणूनच पाकिस्तान प्रॉक्सी वॉर आणि खोटी लढाईद्वारे हिंदुस्थानला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानला काही करून त्यांचे अस्तित्व दाखवायचे असून दिल्ली बॉम्बस्फोट हा त्याच प्रयत्नांचा भाग होता. परंतु, मला आनंद आहे की आजचा हिंदुस्थान बदललेला असून हिंदुस्थानने घातपात आधीच ओळखला आणि वेळीच कारवाई करण्यात आली. त्यांचा हेतू हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट घडवण्याचा होता. मुंबईसह अनेक शहरे त्यांच्या निशाण्यावर होती, असेही जनरल द्विवेदी म्हणाले.

यावेळी जनरल द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भाष्य करत पाकिस्तानला इशारा दिला. चित्रपट सुरूही झाला नव्हता. आम्ही फक्त एक ट्रेलर दाखवला आणि तो 88 तासात संपला. भविष्यातील गोष्टींसाठीही आम्ही तयार असून पाकिस्तानने पुन्हा संधी दिल्यास त्यांना जबाबदार राष्ट्रासोबत कसे वागावे हे शिकवू, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी पहाटे 7 वाजता कारवाई सुरू झाली होती आणि याद्वारे पाकिस्तान तसेच पीओकेतील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये जवळपास 88 तास युद्ध सुरू होते. अखेर 10 मे रोजी दोन्ही देशात युद्ध थांबवण्याबाबत एकमत झाले. अर्थात याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा टॅरिफची धमकी देऊन युद्ध थांबवल्याचे म्हटले. मात्र हिंदुस्थानने यात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नसल्याचे म्हटले.