हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन तीन आठवडे झाले. आतापर्यंत 135 लाख मॅट्रिक टन ऊस गाळप झाले असून शंभर लाख क्विंटल नवी साखर तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये गाळभंगाच्या पहिल्या टप्प्यात अनुकूल हवामान आणि कारखान्यांची गाळप क्षमता याचा मेळ बसल्याने हंगामाने पहिल्या तीन आठवडय़ांतच जोर धरला आहे.

 सद्यस्थितीमध्ये दीडशेपेक्षा अधिक साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केलेला आहे. प्रत्यक्षात एक नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाला असला तरी कारखाने काही दिवस मागेपुढे सुरू झाले. सुरुवातीचे काही दिवस पावसाचे असल्यामुळे आठवडा तसा वाया गेला. नंतर मात्र हंगामाने जोर पकडला. 80 सहकारी आणि 70 खासगी कारखान्यांनी मिळून दहा टक्के म्हणजे 135 लाख टन उसाचे गाळप केले आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्या टप्प्यातच साखर उतारा अपेक्षेपेक्षा चांगला मिळत असल्याने कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीची तुलना करता उसाचा तुटवडा असल्यामुळे हंगाम 15 नोव्हेंबरला सुरू झाला. 20 नोव्हेंबरपर्यंत अवघे 17 लाख टन गाळप होते आणि साखर उत्ताराही पावणेपाच टक्केच होता. चालू हंगामात साखर उतारा सुरवातीलाच 7.47 टक्के मिळाल्याने कारखान्यांबरोबर शेतकऱयांनाही त्याचा फायदा होणार आहे.

हमीपत्रावर परवाने

साखर आयुक्तालयाने 193 साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. एफआरपी शिल्लक असलेल्या कारखान्यांचे गाळप हंगामासाठी परवाने अडवता येणार नसल्याच्या सूचना राज्य सरकारच्या आहेत. त्यामुळे अशा कारखान्यांकडून हमीपत्रे घेतली आहेत.