
विलेपार्ले पश्चिम येथील नानावटी रुग्णालयात दोन लाख रुपयांसाठी एका रुग्णाचा डिस्चार्ज रोखल्याचे समोर आले आहे. समरजीत सुखदेव सिंग असे या रुग्णाचे नाव आहे. समरजीत यांनी स्वतः व्हिडिओ शेअर करून त्यांची व्यथा मांडली आहे. दोन लाखांसाठी डिस्चार्ज रोखल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या 27 दिवसांपासून समरजीत नानावटी रुग्णालयात आहेत. ताप डोक्यात गेल्यामुळे ते येथे भरती झाले होते. साधारण 14 दिवसांचे उपचार असून तुम्ही ठणठणीत बरे व्हाल, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. या उपचारांसाठी मित्रमंडळी व नातलगांकडून उसनवारी करून त्यांनी बराच खर्च केला. खर्च वाढतच गेल्याने त्यांनी बिलिंग डिपार्टमेंटकडे चौकशी केली व बिल मागवले. या बिलात नमूद उपचार आणि प्रत्यक्षात देण्यात आलेले उपचार यात मोठी तफावत होती, असा दावा समरजीत यांनी केला आहे.
उपचार पूर्ण झाल्यानंतरही डिस्चार्ज दिला जात नसल्याचा आरोप समरजीत सिंग यांनी केला. बिलात दुरुस्ती करण्याची विनंती आम्ही केली. मात्र, ती फेटाळण्यात आली.
डिस्चार्ज हवा असेल तर एक लाख रुपये भरा, असे तेथील अकाऊंटटने मला सांगितले. शेवटी नाईलाजाने आम्ही 1 लाख रुपयांची व्यवस्था केली. त्यातले 50 हजार रुपये भरले. राहिलेले डिस्चार्ज पेपर मिळाल्यानंतर देऊ असे सांगितले. मात्र आता ते 2 लाख रुपयांची मागणी करत आहेत,’ असा आरोप समरजीत यांनी केला आहे.
इथेच जीव द्यावा लागेल!
‘नानावटीतील मानसिक छळामुळे आम्ही कंटाळलो आहोत. आमच्याकडे आता काहीच उरलेले नाही. दोन मुलांना दुसऱयांकडे सोडून आम्ही 27 दिवसांपासून येथे आहोत. मी आणि माझी पत्नी दोघेही मानसिक तणावात आहोत. आता सहन होत नाही. इथेच आत्महत्या करण्याशिवाय मला पर्याय नाही,’ असा इशारा समरजीत यांनी दिला आहे.
आरोप काय…
1700 रुपयांच्या इंजेक्शनचे शुल्क 17 हजार रुपये लावले
डॉक्टर तपासणीसाठी दहा वेळा आले, बिलात 17 व्हिजिट दाखवल्या.
एकदाच केलेली टेस्ट दोनदा केल्याचे दाखवले.
या बातमीसाठी इंग्रजी SEO लिहून द्या.




























































