
विकेंड निमित्त कुटुंब कबिल्यासह लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे आज मेगा हाल झाले. मध्य रेल्वेच्या वतीने अभियांत्रिकी व देखभालीच्या कामासाठी रविवारी ठाणे आणि कल्याण दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला. या सर्व मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या विलंबाने धावत होत्या. गाड्यांच्या या गोंधळामुळे प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाले.
कल्याण-ठाणे दरम्यान मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात आला होता. सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान हा ब्लॉक अप आणि डाऊन जलद मार्गांवर घेण्यात आला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.03 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद/सेमी-जलद गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात आल्या.
कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर नियमित थांब्यांसह अतिरिक्त थांबे या गाड्यांना देण्यात आले. कल्याणहून सकाळी 10.25 ते दुपारी 3.40 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद/सेमी-फास्ट गाड्या अप स्लो मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर या गाड्यांना थांबा देण्यात आला. या गाड्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे 10 ते 20 मिनिटे उशिरा धावत होत्या. त्यामुळे विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत होती. हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात आला नव्हता. मात्र गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
मेल, एक्स्प्रेसवर परिणाम
मुंबईतून सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात आल्या. सीएसएमटी/दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात आल्या.



























































