विलेपार्ले येथे अग्नीशस्त्र तस्करी करणारे दोघे ताब्यात

विलेपार्ले येथे अग्नीशस्त्र तस्करीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-8ने तब्यात घेतले. आकाश उईके आणि ऋषी तिरकी अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांकडून पोलिसांनी 2 पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्या विरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

विलेपार्ले येथे काही जण शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-8ला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक निरीक्षक प्रभू, रोहन बगाडे, हकट, काकड, सटोले, रहेरे आदींच्या पथकाने विलेपार्लेच्या हनुमान रोड मेट्रो स्टेशनच्या खाली सापळा रचला. आकाश आणि ऋषीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्या दोघांना थांबण्यास सांगितले. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडून पोलिसांनी 2 पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त केली. अग्नीशस्त्र तस्करी प्रकरणी त्या दोघांविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. आकाश आणि ऋषी हे दोघे मूळचे मध्य प्रदेशच्या भोपाळचे रहिवाशी आहेत. ते दोघे अग्नीशस्त्र कोणाला देणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.