
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, ही निवडणूक पालिकेच्या प्रशासनासाठी मात्र आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांना थकबाकी भरणे बंधनकारक असल्याने अल्पावधीतच पालिकेच्या तिजोरीत 10 लाख 36 हजार 831 रुपयांची भर पडली आहे.
राजापूरसारख्या ‘क’ वर्ग नगरपालिकेला शासनाकडून मिळणारा निधी आणि तुटपुंजे उत्पन्न यामुळे शहराचे रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधांचा डोलारा सांभाळताना कसरत करावी लागते. त्यामुळे शहराच्या विकासासाठी नागरिकांकडून मिळणारा कर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यंदाच्या निवडणुकीने कर वसुलीचे काम प्रशासनासाठी अत्यंत सोपे केले आहे.
निवडणूक कालावधीत झालेल्या या विक्रमी वसुलीची आकडेवारी पाहता, घरपट्टीच्या माध्यमातून सर्वाधिक म्हणजेच 7 लाख 61 हजार 781 रुपये पालिकेच्या खात्यात जमा झाले आहेत. त्याखालोखाल पाणीपट्टीच्या स्वरूपात 2 लाख 75 हजार 050 रुपयांची वसुली झाली आहे. अशा प्रकारे घरपट्टी आणि पाणीपट्टी मिळून एकूण 10 लाख 36 हजार 831 रुपये जमा झाले आहेत.
थकबाकी भरण्याला प्राधान्य
निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या उमेदवाराला तो पालिकेचा थकबाकीदार नसल्याचे सिद्ध करावे लागते. उमेदवाराच्या अर्जावर स्वाक्षरी करणाऱ्या सूचकांकडेही पालिकेची कोणतीही थकबाकी असता कामा नये, अशी अट आहे. त्यामुळे आपला अर्ज बाद होऊ नये या भीतीपोटी इच्छुकांनी स्वतःसह आपल्या सूचकांचीही थकबाकी तातडीने भरण्याला प्राधान्य दिले.



























































