
हिंदुस्थानी वंशाचे स्टील उद्योगपती लक्ष्मी मित्तल हे बऱ्याच काळापासून युकेमध्ये राहत आहेत. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी युके सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टील कंपनीचे मालक ब्रिटनमधील अव्वल अब्जाधीशांपैकी एक म्हणून ओळखले जातात. परंतु आता लक्ष्मी मित्तल यांनी एक मोठा निर्णय घेत ब्रिटन सोडत असल्याचे आता जाहीर केले आहे. श्रीमंतांवर कर वाढवण्याच्या नवीन लेबर पार्टी सरकारच्या तयारीमुळे मित्तल यांनी हा निर्णय घेतल्याचे वृत्त द संडे टाईम्सने दिले आहे. मित्तल यांची एकूण संपत्ती अंदाजे १५.४ अब्ज पौंड (सुमारे १.८ लाख कोटी रुपये) आहे. ते ब्रिटनमधील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
ब्रिटन २०% एक्झिट टॅक्स लादण्याची तयारी करत आहे. चांसलर राहेल रीव्हज यांच्या नेतृत्वाखालील कामगार सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २० अब्ज पौंड (सुमारे $२६ अब्ज) उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. राहेल रीव्हज यांचे बजेट २६ नोव्हेंबर रोजी नियोजित आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात भांडवली नफा करातही वाढ करण्यात आली होती. व्यवसाय मालकांसाठी कौटुंबिक व्यवसाय हस्तांतरणावरही नवीन कर लादण्यात आले होते. आता अशी अटकळ आहे की सरकार यूके सोडणाऱ्या श्रीमंत व्यक्तींवर २०% एक्झिट टॅक्स लादू शकते. शिवाय, वारसा करात बदल झाल्याच्या वृत्तांमुळे लक्ष्मी मित्तल यांच्यासह अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
मित्तल यांच्या कुटुंबाच्या एका सल्लागाराने सांगितले की, उत्पन्न कर किंवा भांडवली नफा कर ही समस्या नाही… खरा मुद्दा वारसा कराचा आहे. परदेशातून आलेल्या अनेक श्रीमंत लोकांना हे समजत नाही की, ब्रिटिशांनी त्यांच्या संपूर्ण जागतिक संपत्तीवर कर का लावावा.” सल्लागार म्हणाले की, अशा धोरणांमुळे श्रीमंत ब्रिटनपासून दूर जात आहेत.
नवीन कर धोरणांमुळे केवळ मित्तलच नाही तर ३७ वर्षीय भारतीय-अमेरिकन हरमन नरुला देखील युके सोडून दुबईला जात आहे. तो इम्प्रोबेबल एआय कंपनीचा मालक आहे आणि तो दोन वर्षांचा असल्यापासून युकेमध्ये राहत आहे. हे पाऊल ब्रिटिश सरकारसाठी एक समस्या आहे, कारण मित्तलसारखे लोक केवळ कर भरत नाहीत तर नोकऱ्या आणि गुंतवणूक देखील आणतात. लेबर पार्टीच्या या धोरणामुळे श्रीमंत व्यक्तींना ब्रिटन सोडण्यास भाग पाडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अहवालात म्हटले आहे की अनेक जागतिक उद्योजक ब्रिटन सोडण्याचा विचार करत आहेत.























































