पाकिस्तानच्या सैनिक मुख्यालयावर आत्मघातकी दहशतवादी हल्ला, तीन जणांचा मृत्यू

सोमवारी सकाळी पाकिस्तानच्या पेशावर येथे फ्रंटियर कॉन्स्टॅब्युलेरी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात तीन कमांडो आणि तीन हल्लेखोरांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हा हल्ला पॅरामिलिटरी इमारतीच्या मुख्य गेटवर दोन स्फोटांनी सुरू झाला, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर सशस्त्र हल्लेखोरांनी परिसरात घुसून सुरक्षा दलांशी चकमक केली. हा हल्ला सकाळी सुमारे 8 वाजता झाला. एफसी कमांडो आणि पोलीस दलांनी प्रत्युत्तरात्मक कारवाई करत परिसरात प्रवेश केलेल्या तीन हल्लेखोरांना ठार केले.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या संकुलावर किमान दोन आत्मघाती हल्लेखोरांनी हल्ला केला होता. पोलिसांनी सांगितले की, प्रवेशद्वारावर झालेल्या स्फोटात तीन एफसी जवान ठार झाले, तर हल्लेखोर गोळीबारात मारले गेले.

पेशावरचे कॅपिटल सिटी पोलिस अधिकारी डॉ. मियाँ सईद यांनी सांगितले की परिसर सील करण्यात आला असून, उरलेला धोका दूर करण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

“आत्मघाती हल्लेखोराने प्रथम मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला केला आणि दुसरा आतमध्ये शिरला,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. लष्कर आणि पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे, परंतु मुख्यालयात अजून काही दहशतवादी लपलेले असल्याचा संशय आहे.

दरम्यान, खैबर पख्तूनख्वाचे आयजी झुल्फिकार हमीद यांनी जिओ टीव्हीशी बोलताना या आत्मघाती हल्ल्यांची पुष्टी केली आणि स्फोट फेडरल कॉन्स्टॅब्युलेरी मुख्यालयातील सदर भागाजवळ झाल्याचे सांगितले. “एक स्फोट मुख्य दरवाज्याजवळ झाला आणि दुसरा मोटरसायकल स्टँडवर. मोटरसायकल स्टँड हा दरवाज्याच्या आत आहे,” असे ते म्हणाले.