
मोठ्या मुलीच्या मृत्यूनंतर मानसिक तणावात असलेल्या कुटुंबाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील हैदराबाद येथे ही घटना घडली. मृतांमध्ये आई, वडिल आणि लहान बहिणीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
हैदराबादमधील अंबरपेट येथील मल्लिकार्जुन नगर येथे श्रीनिवास हे पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते. नुकतेच श्रीनिवास यांच्या मोठ्या मुलीचे निधन झाले होते. यामुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसला होता. शिवाय, कुटुंब आर्थिक अडचणींचाही सामना करत होते.
कुटुंब काही महिन्यांपूर्वीच अंबरपेट येथे स्थलांतरित झाले होते. श्रीनिवास यांची मोठी मुलगी काव्या हिने आरोग्याच्या कारणातून जीवन संपवले होते. यानंतर आमची मुलगी गेली आहे आणि आम्हालाही देव बोलावत आहे, असे श्रीनिवास आणि त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांना सांगितले होते.
दोन दिवस हे कुटुंब घराबाहेर पडले नाही. यामुळे श्रीनिवास यांच्या जवळच्या नातेवाईकाने त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता तिघांचे मृतदेह दयनीय अवस्थेत आढळले. नातेवाईकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली. चिठ्ठीत त्यांनी लिहिले आहे की, ते त्यांच्या मोठ्या मुलीकडे जात आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
























































