
घाटकोपरमध्ये एका चाळीत आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या आगीत चार मुलांसह किमान सहा जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी झालेल्या सर्व सहा जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंत नगरमधील 90 फूट रोडवरील साई नगर येथे दुपारी 12.49 वाजता ही घटना घडली. आगीत विद्युत वायरिंग आणि इन्स्टॉलेशन्स, गळती होणारा एलपीजी सिलेंडर, गॅस स्टोव्ह, भांडी, घरगुती कपडे आणि इतर घरगुती साहित्याचा समावेश होता. अग्नीशमन दल, पोलीस पथके, बीएमसी वॉर्ड कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश मिळाले. प्रतीक कुमार मुखिया (10), गौरी मुखिया (10), प्रशांत विश्वकर्मा (9), पूजा मुखिया (6), दलत देवी मुखिया (40) आणि नागेश्वर मुखिया (45) अशी जखमींची नावे आहेत.

























































