प्रारूप मतदार यादीतील गोंधळ हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा, याद्यांमध्ये बदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार; आदित्य ठाकरेंचा इशारा

प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. हा गोंधळ आहे की, गुन्हा आहे, मला विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील गोधळावरून राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याद्यांमध्ये बदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेली तीन वर्ष या निवडणुका (पालिका) आता होतील, नंतर होतील, याची वाट आम्ही सगळेच पाहत होतो. कारण एकंदरीत आपण पाहिलं तर असंच वातावरण आहे की, हे सरकार, जे निवडणूक आयोगाने बसवलेलं सरकार आहे, मतचोरी करून जिंकून आलेले सरकार आहे. ते प्रत्येक ठिकाणी फक्त भ्रष्टाचार करत आहे. मग तो जमीन घोटाळा असेल, कोण मंत्री बॅग घेऊन बाजूला बसला असेल, कोणाचा डान्सबार असेल, हे सगळे घोटाळे मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर जात आहे आणि जनेतला याचा राग आला आहे. ग्रामीण भागात ही आपण पाहिलं असेल, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पण मदत ही कुठेही पोहोचली नाही. लोकं वाट पाहत आहेत की, आम्ही आमचा निकाल या सरकारवर कधी देऊ.”

आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यावेळी ही निवडणूक जाहीर झाली, पहिलं म्हणजे प्रभाग रचना जाहीर झाल्या. त्यात आम्ही ज्या काही सूचना आणि आक्षेप घेतले होते, तो टप्पा पार झाल्यानंतर जी प्रारूप मतदार यादी ७ नोव्हेंबरला येणार होती, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, ती ७ नाही तर, १४ नोव्हेंबरला येणार आहे. त्यानंतर १४ नाही तर आता २० तारखेला येणार. २० तारखेलाही सगळ्यांना माहित आहे की, जी यादी आली, ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती. ती यादी कुठेही मशीन रिडेबल नाही. यादीत अनेक गोंधळ आहे. यात आमचे सर्व कार्यकर्ते विरोधी पक्ष, ज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि इतर सगळे मित्र पक्ष आहे. कदाचित भाजप सोडून सगळ्याच पक्षांनी यादी वाचन सुरु केली आहे. त्याच रात्री कळायला लागलं. यादीत प्रचंड घोळ झालेला आहे. अनेक प्रभागांमध्ये काही मतदार याद्या अशा होत्या, ज्या प्रारूप मतदार यादीत दाखवल्या आहेत, मात्र त्यात बिल्डिंगच्या-बिल्डिंग दुसऱ्या यादीत टाकल्या आहेत. यात बरोबर काही ठराविक लोक, ज्यात जात, धर्म आणि भाषा असेल. अशी लोक, अशा याद्या या दुसऱ्या प्रभागामध्ये टाकल्या आहेत. विरोधी पक्षाचे काही चांगले प्रभाग डगमगीत करायला दुसऱ्या प्रभागात यादी हलवलेली आहे. हे आरोप आम्ही आता का करत आहोत, कारण आताही आम्ही निवडणूक आयोगात हेच सांगून आलो की, सगळ्या प्रभागात या याद्या हललेल्या नाहीत. याचे आमच्याकडे पुरावे आहेत. काही सत्ताधारी पक्षाचे प्रभाग आहेत, ते तसेच्या तसे आहेत. मग बरोबर विरोधी पक्षाच्या प्रभागांना लक्ष्य करून या या याद्या हलल्या कशा? कोणी हलवल्या?”

ते पुढे म्हणाले, “प्रारूप मतदार यादीत एक दिसत आहे आणि यादीत दुसरं दिसत आहे. याचा नक्की गोंधळ कुठे झाला आहे, हा गोंधळ आहे की, गुन्हा आहे, मला विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे. या देशात संविधानाप्रमाणे आणि लोकशाही, जी आता आतापर्यंत पाळत आलो आहे. आता आमची मान्यता ही आहे की, देशात लोकशाही आहे की, नाही? याच्यावर आता विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. लोकशाहीत जर आपण मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांबद्दल बोलत असू तर, त्यात या मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीत कुठेही असा गोंधळ होऊ नये.”

निवडणूक आगोगल इशारा देत आदित्य ठाकरे म्हणाले की, “203 प्रभागांची यादी आम्हाला मिळाली. ती आम्ही रीतसर महानगरपालिकेच्या कार्यलयातून विकत घेतली होती. त्यावर प्रकाशित तारीख १४ नोव्हेंबर आहे, मग ही तारीख १४ नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला यादी २० तारेखला कशी दिली? मग हा गुन्हा आहे की, गोंधळ आहे? सातत्याने आम्ही हेच सांगत आहोत की, जर तुम्ही हे बदललं नाही, म्हणजे तुमच्या मनामध्ये पपा आहे. तुमच्या ह्रदयात देशद्रोह आहे आणि तुमवर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे. हे बदल जर घडले नाहीत तर, अर्थात विरोधी पक्ष रस्त्यावर उरणारच. पण कोर्टातही आम्ही याच मागणी घेऊन जाऊ की, यांचं निलंबन झालं पाहिजे आणि नुसतं निलंबन नाही तर, देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे.”