
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीची अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱया नराधमाला फाशी द्या, या मागणीसाठी सोमवारी संतप्त तरुणाने धुळे जिह्यातील पिंपळनेर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. ‘इथे एका दिवसात सरकार पडू शकतं, मग नराधमाला फाशी का दिली जाऊ शकत नाही?’ असा सवाल केला.
धुळे जिह्यातील पिंपळनेर येथून शिंदे यांचा ताफा नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी नाशिक जिह्यातील सटाण्याकडे येत होता. वाटेतच पिंपळनेर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन संधानशिव यांनी ताफा अडवला, फलक झळकवला. डोंगराळे येथील चिमुकलीची निर्घृण हत्या करणाऱया नराधमाला त्वरित फाशी द्या, अशी मागणी केली. ‘जर इथे एका दिवसात सरकार पडू शकतं, तर मग नराधमाला फाशी का देऊ शकत नाही?’ असा संतप्त सवाल त्यांनी शिंदे यांना केला. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
























































