
चेंबूर येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कालिका मातेच्या मंदिरातील मुख्य पुजाऱयानेच कालिका मातेला मदर मेरीचे रूप दिल्याने गदारोळ उडाला. या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर आरसीएफ पोलिसांनी त्या पुजाऱयाला बेडय़ा ठोकल्या. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चेंबूरच्या वाशीगाव येथील स्मशानभूमीत कालिका मातेचे मंदिर आहे. या मंदिरातील पुजारी रमेश योगेश्वर (50) या मुख्य पुजाऱ्याने कालिका मातेला मदर मेरीचे रूप दिले. त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात चर्चसारखी सजावट केली. कालिका मातेच्या बाजूला हातामध्ये लहान बाहुली ठेवलेली होती. तसेच मातेला पिवळे वस्त्र नेसवण्यात आले होते. हा प्रकार काही नागरिकांच्या नजरेस पडताच त्यांनी या कृत्याला जोरदार आक्षेप घेतला. हे धर्मविरोधी कृत्य असून हे सहन केले जाणार नाही असे म्हणत नागरिकांनी कालिका मातेला दिलेल्या मदर मेरीच्या रुपाला व चर्चसारख्या सजावटीला जोरदार आक्षेप घेतला. याविरोधात आरसीएफ पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पुजाऱयाला अटक केली.
स्वप्नात आलं आणि केलं
कालिका माता स्वप्नात आली होती आणि तिने मला मदर मेरीचे रूप दे असे सांगितले होते. त्यानुसार मी कालिका मातेला मदर मेरीचे रूप दिले होते असे त्या पुजाऱयाचे म्हणणे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. दरम्यान हा प्रकार कळल्यानंतर तत्काळ त्या मंदिराची साफसफाई करण्यात आली. सध्या ते मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे.
तो नवनवीन रूप द्यायचा
तो पुजारी गेल्या 16 वर्षांपासून त्या मंदिरात पुजाऱयाचे काम करतोय. तो कालिका मातेला नवनवीन रूप द्यायचा. या वेळी त्याने मदर मेरीचे रूप दिले होते. परंतु नागरिकांनी त्याला कडाडून विरोध करत पोलिसांकडे पुजाऱयाची तक्रार केली. पुजाऱयाने धार्मिक भावना दुखावल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

























































