घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, कानाचा तोडला लचका; मुलाची प्रकृती गंभीर

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम नगर परिसरात एका पिटबुल कुत्र्याने 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलावर हल्ला केला. कुत्र्याने मुलाला इतके चावले आणि ओरबाडले की त्याचे उजवा कान तुटला आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरमी कुत्र्याच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामुळे पिटबुल कुत्रा पाळण्यावर प्रश्न निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याच्या मालकाची ओळख राजेश पाल म्हणून झाली आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली, जेव्हा मुलगा आपल्या घराच्या बाहेर खेळत होता. प्रेम नगर पोलिस ठाण्यात संध्याकाळी 5.38 वाजता फोन आला, ज्यात सांगण्यात आले की एक पिटबुल कुत्रा मुलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे आणि त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात नेले आहे.

मुलगा विनय घराबाहेर खेळत होता, तेव्हा अचानक पिटबुल शेजाऱ्याच्या घरातून बाहेर आला आणि मुलावर झडप घालत हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आणि कुत्र्याने त्याचा उजवे कान चावून वेगळा केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की शेजाऱ्यांच्या मदतीने मुलाचे पालक त्याला वाचवू शकले आणि रोहिणी येथील रुग्णालयात नेले. त्यानंतर मुलाला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक चौकशीनुसार, साधारणपणे दीड वर्षांपूर्वी राजेश पाल यांचा मुलगा सचिन पाल हा कुत्रा घरी घेऊन आला होता. सध्या सचिन पाल हत्या करण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणात तुरुंगात आहे.