
बाल्कनीतून लग्नाची वरात पाहत असताना वऱ्हाड्यांनी केलेल्या गोळीबारात तरुणीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. श्यामनगरहून हापूर रोडवरून लग्नाची वरात चालली होती. यादरम्यान लिसाडी गेट परिसरात अफसा नामक तरूणी तिच्या घराच्या बाल्कनीतून लग्नाची वरात पाहत होती. यावेळी लग्नाच्या वरातील काही वऱ्हाड्यांनी आनंदाच्या भरात हवेत गोळीबार केला. यावेळी वरात पाहत असलेल्या अफसाच्या डोक्यात त्यातील एक गोळी घुसली.
गोळी लागल्याने जखमी झालेल्या अफसाला कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. रात्री उशिरा मुख्य आरोपी साकिबला अटक करण्यात आली आहे. साकिबच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
























































