
गुवाहाटी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानपुढे विजयासाठी 549 धावांचे आव्हान ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिंदुस्थानची अवस्था 2 बाद 27 अशी झाली होती. साई सुदर्शन 2, तर नाईट वॉचमन म्हणून आलेला कुलदीप यादव 4 धावांवर खेळत होता.
आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानचे दोन्ही सलामीवीर यशस्वी जैस्वाल (13 धावा) आणि केएल राहुल (6 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यामुळे पाचव्या दिवशी उर्वरित 8 फलंदाजांवर कसोटी वाचवण्याची मदार आहे. मात्र पहिल्या डावातील फलंदाजी आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीचा नूर पाहता आफ्रिका ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसते.
Stumps on Day 4⃣
See you tomorrow for Day 5️⃣ action.
Scorecard ▶️ https://t.co/Hu11cnrocG#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/MXqtMGMhay
— BCCI (@BCCI) November 25, 2025
पहिल्या डावात 288 धावांची आघाडी घेतलेल्या आफ्रिकेने दुसरा डाव 5 बाद 260 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावामध्ये ट्रिस्टन स्टब्स याने दमदार फलंदाजी करत 94 धावा केल्या. अवघ्या 6 धावांनी त्याचे शतक हुकले. त्याच्या व्यतिरिक्त टोनी डी जोर्झी याने 49, मुल्डर आणि रिकल्टनने प्रत्येकी 35, तर मार्करमने 29 धावांचे योगदान दिले. हिंदुस्थानकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
25 वर्षानंतर मालिका विजयाची चव चाखणार
दक्षिण आफ्रिकेने कोलकाता कसोटी 30 धावांनी जिंकली होती आणि आता गुवाहाटी कसोटीमध्येही आफ्रिकेचा संघ आघाडीवर आहे. तेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेने ही कसोटी जिंकली किंवा अनिर्णित राखली तरी इतिहास रचला जाणार आहे. कारण आफ्रिका तब्बल 25 वर्षानंतर हिंदुस्थानमध्ये कसोटी मालिका जिंकणार आहे. याआधी आफ्रिकेने 1999-2000 मध्ये हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानमध्ये कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली होती.
व्हाईट वॉशचा धोका
हिंदुस्थानवर व्हाईट वॉशचेही संकट आहे. याआधी न्यूझीलंडच्या संघाने हिंदुस्थानला 3-0 असे पराभूत केले होते आणि आता आफ्रिकेनेही 2-0 असा विजय मिळवल्यास हिंदुस्थानच्या क्रिकेट संघासाठी ही लाजिरवाणी बाब असणार आहे. यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.




























































