जितेंद्र सिंह यांच्या विधानानं भाजपच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर आली; राज ठाकरे यांनी घेतला समाचार

आयआयटी बॉम्बेच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले. त्याचे मुंबई केले नाही हे चांगलेच झाले. यामुळे मी खूश आहे, असे संतापजनक वक्तव्य केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट लिहिल जितेंद्र सिंह यांच्यासह भाजपवर हल्ला चढवला.

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. जितेंद्र सिंह यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे? तर मुंबई जी मराठी माणसाची होती, तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

खरंतर जितेंद्र सिंह यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे, असेही ते म्हणाले.

आयआयटीच्या नावात ‘मुंबई’ नाही, ‘बॉम्बे’ आहे, यामुळे मी खूश आहे! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे संतापजनक वक्तव्य

या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय, असेही राज ठाकरे म्हणाले.

आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. ‘मुंबई’ नको ‘बॉंबे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच! आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं! असेही राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले.