
“भाजप-आरएसएसचे लोक संविधानाचे तुकडे करण्यात व्यग्र आहेत. म्हणूनच आज त्यांचा संविधानाबद्दलचा आदर हा फक्त एक दिखावा आहे”, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. आज संविधान दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. खरगे म्हणाले की, “आज नरेंद्र मोदी आपल्याला वसाहतवादाच्या धोक्यांवर व्याख्यान देत आहेत, परंतु हे त्याच विचारसरणीचे लोक आहेत ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात, राष्ट्रीय चळवळीत देशातील लोकांना एक मिनिटही साथ दिली नाही. उलट त्यांनी गुलाम म्हणून ब्रिटिशांची सेवा केली.”
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेसोबत मिळून केवळ संविधानच नव्हे तर, लोकशाहीला सर्वोच्च स्थान देणाऱ्या हिंदुस्थानची निर्मिती केली. न्याय, समता, स्वातंत्र्य, परस्पर बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे हिंदुस्थानचे वैशिष्ट्य बनले आहेत. पण आज या ओळखी धोक्यात आहेत.” ते म्हणाले, “जेव्हा संविधान लागू करण्यात आले, तेव्हा आरएसएससारख्या संघटनांनी उघडपणे सांगितले की, संविधान पाश्चात्य मूल्यांवर आधारित आहे आणि त्यांचा आदर्श मनुस्मृती आहे. इतिहास संविधानाला त्यांच्या विरोधाची साक्ष देतो. आज विडंबना अशी आहे की, जे एकेकाळी संविधानापेक्षा मनुस्मृतीचा जास्त आदर करत होते, ते सत्तेत आल्यानंतर सक्ती आणि राजकीय गरजेपोटी, त्याच संविधानाला स्वतःचे म्हणून दावा करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले की, “११ डिसेंबर १९४८ रोजी त्यांनी रामलीला मैदानावर एक मोठा मेळावा घेतला होता आणि डॉ. आंबेडकरांचा पुतळा जाळला होता. संघाने केवळ संविधान आणि तिरंग्याला विरोध केला नाही तर, ब्रिटिश राजवटीत स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात टाकले गेले तेव्हा ते ब्रिटिशांच्या पाठीशी उभे राहिले आणि मोदी लाल किल्ल्यावरून त्याच संघाचे कौतुक करतात.”
ते म्हणाले की, “देशातील जनतेला कळले आहे की, या संस्थांना कोण नुकसान पोहोचवत आहे. हे भाजप-आरएसएस सदस्य संविधानाचे तुकडे करण्यात व्यग्र आहेत. म्हणूनच आज त्यांचा संविधानाबद्दलचा आदर केवळ एक ढोंग आहे. त्यांनीच संविधानाच्या प्रती जाळल्या आणि आज ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुले अर्पण करत आहेत. हा संविधानाचा आणि आपल्या पूर्वजांचा सर्वात मोठा विजय आहे.”



























































