
एसआयआरमागील खरा हेतू एनआरसी आहे, असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर बोल केला आहे. आज पश्चिम बंगालमध्ये संविधान दिनानिमित्त रेड रोडवर सभेत बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, “आज जेव्हा लोकशाही आणि धर्मावर हल्ला होत आहे आणि नागरिकत्व, मतदानाच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, तेव्हा आपण स्वतःला विचारले पाहिजे की, आता आपल्याला आपल्या नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागेल का? यामागे एनआरसी आहे.” आज मी येथे हिंदुस्थानच्या लोकशाहीचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करते, असंही त्या म्हणाल्या आहेत.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आज आपल्याला सत्तेत असलेल्यांच्या दयेने स्वातंत्र्य मिळाले नाही तर, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांपैकी ९० टक्के लोक बंगाली होते, तर पंजाबनेही यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. हिंदुस्थानात पुनर्जागरण आणि क्रांती घडवून आणणारे बंगाल होते.”
त्या म्हणाल्या की, “लोकशाही अधिकार हिरावून घेतली जात आहे आणि सर्वत्र धार्मिक आधारावर फूट पाडली जात आहे. हे पाहून दुःख होत आहे. लोकांवर अत्याचार केले जात आहेत, मग ते दलित असोत, आदिवासी असोत, अल्पसंख्याक असोत किंवा हिंदू मतदार असोत. मृत्युमुखी (एसआयआरमुळे) पडलेल्यांपैकी बहुतेक हिंदू होते. आपण सर्व एक आहोत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.”
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, “तुम्ही दोन महिन्यांत तीन वर्षांचे काम (एसआयआरचे) कसे पूर्ण करू शकता? हा शेतीचा हंगाम आहे. पत्रकारही दिवसभर घरी राहत नाहीत. फॉर्म वाटपाचे आकडेही चुकीचे आहेत. आम्ही संविधानाचा आदर करू आणि त्यानुसार काम करू. आम्ही स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करू, भाजपच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू नका.”




























































