
जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत हिंदुस्थानच्या रुपयाचे डॉलरच्या तुलनेत 4.3 टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. रुपया हे आशियातील सर्वांत खराब कामगिरी करणारे चलन ठरल्याचे विश्लेषकांनी सांगितले. अमेरिकेसोबतचा व्यापार करार लवकर न झाल्यास रुपया आणखी घसरून प्रति डॉलर 90 रुपये या स्तरालाही जाऊ शकतो, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार चिनी युआन आणि इंडोनेशियन रुपियाच्या तुलनेत रुपयाची कामगिरी कमकुवत राहिली असली तरी, जपानी येन आणि कोरियन वॉनसारख्या रचनात्मकदृष्ट्या कमकुवत चलनांपेक्षा परिस्थिती तुलनेने स्थिर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तज्ञांच्या मते, रुपयाचा प्रवास हा आता देशांतर्गत मूलभूत घटकांपेक्षा जागतिक स्तरावरील डॉलरच्या बळावर अधिक अवलंबून आहे. भांडवली बाजारातून बाहेर जाणाऱ्या निधीमुळे अनेक महिन्यांपासून रुपयावर दबाव कायम आहे. आशियातील इतर चलनांच्या तुलनेत रुपया कमकुवत ठरला असून, चालू वर्षात त्यात सुमारे 4 टक्क्यांनी घसरण झाली आहे. दरम्यान, चिनी युआनमधील बळकटी आणि पीपल्स बँक ऑफ चायनाच्या हस्तक्षेपामुळे इतर आशियाई चलने मजबूत होत असल्याचे विश्लेषणात सांगण्यात आले. 21 नोव्हेंबर 2025 रोजी रुपया 88.8 च्या पातळीवरून घसरत 89.66 या नव्या नीचांकाला पोहोचला होता; त्यानंतर थोडी सुधारणा झाली आणि तो 89.22 या स्तरावर व्यवहारात होता.
अलीकडील दोन महिन्यांत डॉलरच्या 3.6 टक्के बळकटीमुळे जागतिक चलनांवर दबाव वाढला असून, याचा परिणाम म्हणून रुपयावरही नकारात्मक प्रभाव जाणवतो आहे. अमेरिकेच्या वाढीव शुल्कामुळे आणि मौल्यवान धातूंच्या उच्च किंमतींमुळे हिंदुस्थानवर बाह्य आर्थिक धक्क्यांचा परिणाम होत आहे. ट्रम्प प्रशासनाने हिंदुस्थानवर लादलेल्या 50 टक्के आयात शुल्कामुळे निर्यातीवर फटका बसला आणि ऑक्टोबर महिन्यात 41.7 अब्ज डॉलरचा विक्रमी व्यापारतूट नोंदवली गेली आहे. ज्यामुळे रुपयावर आणखी दबाव निर्माण झाल्याचे अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले.































































