
तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी 2750 मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यासाठी साधारणतः 24 तासांचा कालावधी आवश्यक आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणीपुरवठय़ामध्ये 15 टक्के घट होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या 14 वॉर्डमध्ये 3 डिसेंबर ते 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठय़ात 15 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. जलवाहिनी बदलाच्या कामामुळे मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरातील एल आणि एस विभाग अशा एकूण 14 प्रशासकीय विभागांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ात 15 टक्के कपात केली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवावे आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


























































