
हिंदुस्थानी संघ ईडन गार्डन्सचे अपयश बरसापारावर धुवून काढेल, अशी अपेक्षा होती, पण बरसापारा स्टेडियमवरही हिंदुस्थानवर दारुण पराभवाची नामुष्की ओढवली. ओढावली कसली आफ्रिकन खेळाडूंच्या जिगरबाज खेळाने ते ओढवायला भाग पाडले. जगातील सर्वोत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी असलेली फलंदाजी आणि गोलंदाजीत अचानक कमकुवत झाली. परिणामत: दक्षिण आफ्रिकन संघाने हिंदुस्थानी संघाची अक्षरशः कत्तल केली. हिंदुस्थानी संघाचे अवघ्या 140 धावांतच पोस्टमॉर्टम करत दुसऱ्या कसोटीत 408 धावांच्या महाविजयाचा बार उडवला. त्याचबरोबर तब्बल 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानात कसोटी मालिका विजयाचा दुष्काळही संपविला.
दुसरीकडे यजमान हिंदुस्थानवर 93 वर्षांच्या कसोटी इतिहासात सर्वात मोठ्या लाजिरवाण्या पराभवाची चव चाखावी लागली. टेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिकेने 2 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 2-0 फरकाने सुपडा साफ केला. गेल्या 12 वर्षांत एकही कसोटी मालिका न गमावणाऱ्या हिंदुस्थानला 12 महिन्यांत दुसऱ्यांदा क्लीन स्वीपच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
हार्मरने घेतली हिंदुस्थानची फिरकी
दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या 549 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानने दुसऱ्या डावात 63.5 षटकांत केवळ 140 धावांवरच शरणागती पत्करली. यजमान संघाने चौथ्या दिवसाच्या 2 बाद 27 धावसंख्येवरून बुधवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र, सायमन हार्मरच्या फिरकीपुढे हिंदुस्थानी फलंदाजी हतबल दिसली. त्याचे चेंडू नसून ते सापाचे दंश असावेत, अशा शैलीत हिंदुस्थानचे फलंदाज कळवले. एकट्या रवींद्र जाडेजाने 54 धावांची खेळी करीत एकाकी किल्ला लढविला. कुलदीप यादव (5), साई सुदर्शन (14), ध्रुव जुरेल (2), कर्णधार ऋषभ पंत (13) ही मधली फळी अपयशी ठरली. सुदर्शन वगळता मधली फळी एकट्या हार्मरने कापून काढली. सेनुरन मुथुसामीने सुदर्शनला बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने 16 धावा करीत जाडेजाला काही वेळ साथ दिली, पण त्यालाही हार्मरनेच कॅव्हेलियनमध्ये पाठविले. त्यानंतर हार्मरच्याच गोलंदाजीवर नितीश कुमार रेड्डीला भोपळाही न फोडता यष्टीमागे व्हेरेनकरवी झेलबाद केले, तर केशव महाराजने मोहम्मद सिराजला शून्यावर जान्सेनकरवी झेलबाद करून दक्षिण आफ्रिकेच्या ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला.
हार्मर, यानसन विजयाचे शिल्पकार
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू सायमन हार्मरला या कसोटी मालिकेतील ‘मालिकावीरा’चा बहुमान मिळाला. दोन सामन्यांच्या मालिकेत त्याने 17 विकेट टिपत ऐतिहासिक मालिका विजयात निर्णायक भूमिका बजावली. याचबरोबर वेगवान गोलंदाज यानसन ‘सामनावीर’ ठरला. त्याने पहिल्या डावात 93 धावा करताना 48 धावांत 6 विकेट टिपले होते,
हिंदुस्थानची धावांच्या फरकाने सर्वात मोठी हार
कसोटीतील जगज्जेत्या दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानला दुसऱ्या डावात 140 धावांत गुंडाळत 408 धावांनी दणदणीत विजय मिळवला. कसोटी इतिहासात आणि घरच्या मैदानावर हिंदुस्थानचा हा धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव ठरला. यापूर्वी, 2004 मध्ये नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला 342 धावांनी हरवले होते.
























































