
पालिका हद्दीतील जाहिरातींचे नियमन करण्याच्या अनुषंगाने पालिकेकडून ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे-2025’ जाहीर करण्यात आली आहेत. 27 नोव्हेंबर 2025 पासून ही मार्गदर्शक तत्त्वे मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. पालिकेने यापूर्वी जाहीर केलेल्या ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे- 2008’ मध्ये सुधारणा करीत 2025 मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही नवीन बाबींचा समावेश केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात 40 बाय 40 फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या जाहिरात फलकास परवानगी दिली जाणार नाही. पदपथ तसेच इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास नव्याने परवानगी दिली जाणार नाही. डिजिटल जाहिरात फलकांची प्रकाशमानता 3:1 या गुणोत्तरापेक्षा अधिक ठेवता येणार नाही.
अशी आहे नियमावली
लुकलुकणाऱ्या जाहिरातींना परवानगी नसेल. मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कमर्शिअल बिल्डिंग, पेट्रोल पंप येथे एलईडी जाहिरात प्रदर्शित करता येईल. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या व दुरुस्तीची कामे सुरू असलेल्या इमारतींच्या कुंपणावर तसेच इमारतीच्या बाह्यभागावर व्यावसायिक व अव्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करता येतील.


























































