
लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना पारदर्शक सेवा मिळावी यासाठी आयआरसीटीसीने नवीन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीअंतर्गत प्रवाशांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील विक्रेत्यांना आता नवीन गणवेश आणि एक विशेष क्यूआर कोड कार्ड प्रदान केले जाईल. यामुळे तक्रारी दाखल करण्याची आणि किमती तपासण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि वंदे भारत हाय-स्पीड ट्रेनमध्ये या उपक्रमाची सुरवात करण्यात येणार आहे.
नवीन गणवेशाच्या मागील बाजूस एक हेल्पलाइन नंबर छापला येईल. यामुळे विक्रेत्यांनी जास्त पैसे आकारल्यास किंवा इतर कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रवाशांना त्वरित कॉल करता येईल. तसेच जलद तक्रार नोंदणी आणि त्वरित कारवाई होईल. अनेक प्रवासी विक्रेत्यांच्या मनमानी किंमतींबद्दल तक्रार करत असतात. याबद्दलचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. यामुळे ही योजना एक महत्वाचे पाऊस मानले जाते.
क्यूआर कोडवर मिळणार दरांची यादी
सध्या विक्रेत्यांना दोन्ही बाजूंनी क्यूआर कोड असलेले एक विशेष कार्ड दिले जाईल. पहिला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रवाशांना त्या विक्रेत्याद्वारे विकल्या जाणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांचे निश्चित दर पाहता येतील. यामुळे प्रवाशांना अचूक किंमतीत वस्तू मिळतील आणि अधिक शुल्क आकारण्याची शक्यता कमी होईल. दुसरा क्यूआर कोड डिजिटल पेमेंटसाठी वापरला जाईल, ज्यामुळे फसव्या व्यवहारांनाही प्रतिबंध होईल.
प्रीमियम ट्रेन्सपासून सुरुवात
ही योजना सुरुवातीला पश्चिम विभागातील शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि वंदे भारत हाय-स्पीड ट्रेन्समध्ये लागू केली जाईल. त्यानंतर हळूहळू ती इतर गाड्यांमध्ये विस्तारली जाईल. यामुळे केवळ प्रवाशांना पारदर्शक सेवा मिळणार नाही तर रेल्वे कॅटरिंग सिस्टममध्येही सुधारणा होईल.


























































