मतदारांना प्रलोभनं देणं भोवणार; शिंदे, अजितदादा, गुलाबराव आणि जयकुमार गोरेंसह 20 नेते रडारवर

नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना प्रलोभनं देणे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आता भोवणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह 20 नेते वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहेत. निधीला कात्री लावणे, तिजोरीच्या चाव्या, लक्ष्मी दर्शन यासारख्या वक्तव्यांबाबत संबंधित जिल्हाधिकाऱयांकडून अहवाल मागवला आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषेचे ताळतंत्र सोडणाऱ्या आणि मतदारांना प्रलोभने देणाऱ्या नेत्यांच्या वक्तव्यांची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे.  आचारसंहितेचा भंग होईल अशी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, जयकुमार गोरे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, भाजप नेत्या चित्रा वाघ आदी नेत्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी तिजोरीच्या चाव्यांबाबत तसेच 2 तारखेला लंका दहन करण्याबाबत वक्तव्य केले होते. तर अजित पवार यांनी निधीला कात्री लावू असे सांगत मतदारांना धमकावले. तर चंद्रकांत पाटील यांनी तिजोरीचा मालक आमच्याकडे असल्याचे वक्तव्य केले होते. गुलाबराव पाटील यांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी लक्ष्मी दर्शन होणार असल्याचे सांगितले. जयकुमार गोरे यांनी देवाभाऊशी इमानदारी राखा असे लाडक्या बहिणींना धमकावले. चित्रा वाघ यांनी खा कुणाचं पण मटण मात्र दाबा कमळाचं बटण, असे विधान केले होते.

तिजोरीचा मालक आमचा – चंद्रकांत पाटील

तिजोरीची चावी अजित पवारांकडे असली तरी मुख्यमंत्री आमचे असल्यामुळे, तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

लक्ष्मी कमळावर बसून येणार – पंकजा मुंडे

महालक्ष्मीला कुठे बसायचं कळतंय, महालक्ष्मी कमळावर बसली आहे, त्यामुळे कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे, असे विधान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

सभेतील वक्तव्ये तपासणार

ज्या ठिकाणच्या सभेत वादग्रस्त आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारी वक्तव्ये करण्यात आली त्या ठिकाणच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी भाषणांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते चांगलेच अडचणीत आले आहेत.

कोण काय बोलले

जे जे बोललो ते आम्ही करणारच. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. माझ्याकडे नगरविकास खाते आहे. उमेश पाटलांकडे तर तिजोरीची किल्ली आहे.

 

आमदारकीचे 21 तारखेला मतदान होते. 18 तारखेला लक्ष्मी दारोदार फिरली. 1 तारखेला रात्री बाहेरच खाटा टाकून झोपा, लक्ष्मी येणार आहे. मालदार नगरविकास खाते आपल्याकडे आहे.

 

माझ्या हातात निधीचा अधिकार आहे. आमच्या विचारांचे सर्व उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला सर्व विकास कामे करून देईन. परंतु जर मतांमध्ये काट मारली, तर निधीलाही काट मारणार.

 

तुम्हाला नवरासुद्धा शंभर रुपये देत नाही. देवाभाऊनी लाडकी बहीण योजना आणली… पंधराशे रुपये तुम्हाला दिलेत. त्याच्याशी इमान ठेवा. देवाभाऊ नसले तर तुमचे पैसै बंद होतील.