का रे अबोला! का रे दुरावा!! फडणवीस-शिंदे एकाच हॉटेलात, पण ना भेट ना बोलणं

शिवसेना फोडताना रात्रीच्या किर्र अंधारात हुडी घालून एकमेकांना भेटणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सोमवारी एकाच हॉटेलात मुक्कामाला होते, एकाच तालुक्यात त्यांच्या सभाही होत्या, परंतु दोघांनी एकमेकांचे चेहरेही पाहिले नाहीत! फडणवीस आणि शिंदय़ांच्या या दुराव्याची आणि त्याहूनही अबोल्याची दिवसभर चर्चा होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून रुसवा आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्यासमोरच त्यांच्या मंत्र्यांना भलेबुरे सुनावले. बिहार निवडणुकीनंतर हा रुसवा अबोल्यात बदलला. आमचे लोक भाजपवाले पळवत असल्याचे रडगाणे घेऊन शिंदे यांनी दिल्ली गाठली होती, परंतु दिल्लीतही त्यांची डाळ शिजली नाही. नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या चिरफळय़ा उडाल्या असून भाजप, अजितदादा आणि मिंधे स्वतंत्र प्रचार करीत आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या आज पैठण तालुक्यात जाहीर सभा होत्या. त्यासाठी मुख्यमंत्री रविवारी रात्रीच हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांचेही आगमन झाले. मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर म्हणजे वरच्या मजल्यावर त्यांचा मुक्काम होता. मुख्यमंत्री सकाळी 10 वाजताच हॉटेलबाहेर पडले. त्यानंतर उपमुख्यमंत्रीही बाहेर पडले. एकाच हॉटेलात मुक्कामी असूनही दोघांनी एकमेकांचे चेहरेही पाहिले नाहीत. या दुराव्याची दिवसभर चर्चा रंगली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता, तुम्ही म्हणता तसं काहीही नाही. आमच्या नियोजित सभांच्या वेळा वेगवेगळय़ा असल्याने भेट होऊ शकली नाही. उद्या भेट होईल, असे उत्तर त्यांनी दिले.