
काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी कारमधून एक कुत्रा संसदेच्या आवारात आणल्याने आज वाद निर्माण झाला. सत्ताधारी खासदारांनी लगेचच यावर काहूर माजवत चौधरी यांना लक्ष्य केले. चौधरी यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘हे मुके जनावर आहे. त्याला घाबरण्याची गरज नाही. कुत्रे चावत नाहीत. संसदेत बसलेले काही लोक चावतात,’ अशी टीका त्यांनी केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. अधिवेशनाला येताना काँग्रेसच्या राज्यसभा खासदार आपल्या कारमध्ये एक कुत्रा घेऊन आल्या होत्या. हा कुत्रा त्यांनी सकाळी रस्त्यावरून उचलला होता. त्यांचा ड्रायव्हर त्याला येथून डॉक्टरकडे नेणार होता, असे त्यांनी सांगितले.

























































