
‘ना वनावर प्रेम, ना धर्मावर… फक्त ठरावीक काँट्रक्टरच्या हितासाठी नाशिकच्या तपोवनातील झाडे तोडण्याचा खेळ रचण्यात आला आहे. नाशिकवर इतकी दादागिरी कोणासाठी? नाशिकचं आणि त्या लाडक्या काँट्रक्टरचं काय देणंघेणं’, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला. तपोवन वाचलं पाहिजे, तपश्चर्येचं वन काँट्रक्टरच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
नाशिकमध्ये वृक्षवेलींनी नटलेलेल्या तपोवनातील प्रस्तावित ‘साधूग्राम’च्या नावाखाली शेकडो झाडे तोडण्याचा घाट सरकारने घातला आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला चांगलेच फटकारले. नाशिकमध्ये स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन तपोवन वाचवण्यासाठी आंदोलन केले. कारण हा मुद्दा राजकारणाचा नाही, तर तो निसर्गाचा, जीवनाचा आणि नाशिकच्या अस्तित्वाचा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
…त्यांचा खरा हेतू वेगळाच!
आजूबाजूला पाहिलं की दिसते ती झाडांची कत्तल आणि वाढते प्रदूषण. तरीसुद्धा भाजप सरकार तपोवन म्हणजेच तपश्चर्येचे वन तोडून साधूग्राम उभारणार असल्याचे समोर आले आहे. पण त्यांचा खरा हेतू वेगळाच आहे. या ठिकाणी मोठं एक्झिबिजन सेंटर, हॉल, बंगला उभारण्याची योजना आहे. त्यासाठी टेंडरही काढले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आमचं सरकार असताना जानेवारी 2022मध्ये पर्यावरण मंत्री म्हणून मी नाशिकमधील वडाचं झाड वाचवलं होतं आणि अजनी पर्वतावरील वनस्पतींनाही ‘विनाशवादी काँट्रक्टरप्रेमींचा हात लागू दिला नव्हता. कारण निसर्गाचं रक्षण हेच खरं कर्तव्य!
आदित्य ठाकरे, शिवसेना नेते






























































